

नाशिक : महाराष्ट्र त्याच्या उद्योजकीय भावनेने आणि मजबूत औद्योगिक पायामुळे भारताच्या एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग' यशोगाथेला आकार देण्यात नेहमीच आघाडीवर राहिला आहे. समृद्ध आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीत एमएसएमईची भूमिका महत्त्वाची असेल, असे प्रतिपादन राज्य शासनाचे विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंग कुशवाह यांनी केले.
भारतीय उद्योग महासंघाच्यावतीने (सीआयआय) आयोजित शिखर परिषदेत 'भविष्यासाठी तयार एमएसएमई-विकसित भारतासाठी विकसित एमएसएमई' या थीमवर ते बोलत होते. यावेळी परिषदेचे उपाध्यक्ष तथा सॅनी हेवी इंडस्ट्री इंडिया प्रा. लि. चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक गर्ग यांनी, एमएसएमई वाढीची पुढील लाट नाविन्यपूर्णता, शाश्वतता आणि जागतिक एकात्मतेवर आधारित असावी. तंत्रज्ञानाचा स्विकार करून आणि मजबूत संबंध निर्माण करून आपले एमएसएमई जागतिक विजेते बनू शकतात, असा विश्वास व्यक्त केला. डिक्सन्स इंजिनिअरींग कंपनीचे राहुल दीक्षित म्हणाले, एमएसएमई हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहेत. सीआयआय डब्ल्यूआर उपसमितीचे अध्यक्ष डॉ. के. नंदकुमार यांनी, 'एमएसएमईसाठी नवीन उपक्रम स्विकारण्याची क्षमता, स्पर्धात्मकता टिकवून ठेवण्यासाठी तंत्रज्ञान आणि डिजिटलायझेशन स्विकारणे ही गुरुकिल्ली असेल.'
परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ म्हणाले, महाराष्ट्र नेहमीच भारताचे विकास इंजिन राहिले आहे. योग्य धोरणात्मक पाठिंब्यासह येथील एमएसएमई नवोपक्रम, शाश्वतता आणि समावेशक वाढीमध्ये बेंचमार्क स्थापित करू शकतात. तर, सीआयआय उत्तर महाराष्ट्र झोनचे अध्यक्ष रमेश सालिग्रामा म्हणाले, ऑटोमोटिव्ह आणि अभियांत्रिकीसारख्या उद्योगांसाठी, एमएसएमई केवळ पुरवठादार नाहीत तर गुणवत्ता, कार्यक्षमता आणि तांत्रिक प्रगती चालविणारे धोरणात्मक भागीदार आहेत. परिषदेत वित्त, डिजिटल अवलंब, तंत्रज्ञान भागीदारी आणि शाश्वतता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
वित्तपुरवठा उपलब्धता - कर्ज, अनुदान आणि सरकारी योजनांवरील मार्गदर्शन.
तंत्रज्ञान अपग्रेडेशन - आधुनिक साधने, डिजिटल उपाय आणि उद्योग ४.० पद्धतींचा अवलंब करण्यास समर्थन.
गुणवत्ता आणि उत्पादकता - प्रक्रिया सुधारणा, प्रमाणपत्रे आणि स्पर्धात्मकतेवर सल्ला.
बाजार दुवे - बीटूबी कनेक्शन, पुरवठा साखळी एकत्रीकरण आणि निर्यात संधींची सुविधा.
धोरण आणि अनुपालन - नियामक, कर आणि वैधानिक अनुपालनात हातभार.