

आसिफ सय्यद
नाशिक : महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबाबत सकारात्मक चित्र समोर आले आहे. आरोग्य सेवा आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार राज्यात सरासरी ३४३ लोकांमागे एक डॉक्टर उपलब्ध आहे. अॅलोपॅथी आणि आयुष पद्धतीतील डॉक्टरांची एकत्रित उपलब्धता विचारात घेतल्यास हा आकडा समाधानकारक वाटत असला, तरी प्रत्यक्षात आरोग्यसेवेतील असमानता आणि पायाभूत मर्यादा अधोरेखित करणारा आहे.
शासनाने आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (आयुष) उपचार पद्धतींचा मुख्य आरोग्य व्यवस्थेत समावेश केल्यामुळे आरोग्य सेवांचा विस्तार झाला आहे. विशेषतः ग्रामीण भागात आयुष डॉक्टरांची उपस्थिती महत्त्वाची ठरत आहे.
अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा, आधुनिक उपकरणे, औषधपुरवठा आणि प्रशिक्षित मनुष्यबळ यांची कमतरता जाणवते. काही केंद्रांमध्ये इमारती असूनही सेवा पूर्ण क्षमतेने दिली जात नाही. सर्वसामान्यांना दर्जेदार, सुलभ आणि परवडणारी आरोग्यसेवा मिळण्यासाठी ग्रामीण भागात सुविधा विस्तार, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आणि पायाभूत सुधारणा यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज अधोरेखित होत आहे.
डॉक्टर-लोकसंख्या प्रमाण समाधानकारक असले, तरी डॉक्टरांचे भौगोलिक वितरण असमान आहे. शहरी भागात डॉक्टरांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता असून ग्रामीण आणि दुर्गम भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांवरही डॉक्टरांची कमतरता भासते. त्यामुळे सरासरी आकडा आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांच्यामध्ये मोठी दरी आहे.
डिसेंबर २०२५ अखेर राज्यामध्ये २,१३,५५१ अॅलोपॅथिक डॉक्टर नोंदणीकृत असून, त्यापैकी १,०४,१३९ पदव्युत्तर तज्ज्ञ आहेत. प्रत्यक्ष सेवेत सुमारे ८० टक्के डॉक्टर उपलब्ध असल्याचे गृहीत धरले जाते. याशिवाय आयुष पद्धतींतर्गत १,०५,९६६ आयुर्वेदिक, ९,४६२ युनानी आणि ९०,००६ होमिओपॅथी डॉक्टर नोंदणीकृत आहेत. या सर्वांची एकत्रित उपलब्धता लक्षात घेतल्यास, राज्यातील डॉक्टर-लोकसंख्या प्रमाण १:३४३ इतके येते. राज्यातील आरोग्यसेवा त्रिस्तरीय पायाभूत व्यवस्थेवर आधारित आहे. प्राथमिक स्तरावर १०,७८८ उपकेंद्रे, १,९५३ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ३७४ सामूहिक आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत.
या केंद्रांमधून माता व बाल आरोग्य, लसीकरण, पोषण, कुटुंब कल्याण आणि संसर्गजन्य आजार नियंत्रण यासारख्या मूलभूत सेवा दिल्या जातात. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सहा खाटांचा अंतरुग्ण विभाग, बाह्यरुग्ण सेवा, प्रयोगशाळा आणि औषध सुविधा उपलब्ध आहेत. द्वितीय स्तरावर उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालयांची व्यवस्था असून, तृतीय स्तरावर वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालये कार्यरत आहेत. या रुग्णालयांमध्ये प्रगत वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्या तरी त्यांचे भौगोलिक वितरण प्रामुख्याने शहरी भागात केंद्रित आहे.
अॅलोपॅथिक डॉक्टर्स: २,१३,५५१
आयुर्वेदिक डॉक्टर्स: १,०५,९६६
युनानी डॉक्टर्स: ९,४६२
होमिओपॅथी डॉक्टर्स: ९०,००६
उपकेंद्रे: १०,७८८
सामूहिक आरोग्य केंद्रे: ३७४
फिरती वैद्यकीय पथके: ६६
जिल्हा रुग्णालये: २०
वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालये: २७
स्त्री रुग्णालये: २३
कुष्ठरोग रुग्णालये: २
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालये: २
प्राथमिक आरोग्य केंद्रे: १,९५३
प्राथमिक आरोग्य पथके: १२१
उपजिल्हा रुग्णालये: १०४
सामान्य रुग्णालये: ८
वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्राथमिक आरोग्य केंद्रे: ५
मानसोपचार रुग्णालये: ४
क्षयरोग रुग्णालये: ५