

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्यात तसेच विविध शासकीय व प्रशासकीय कामांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा जन्म आणि मृत्यूचा दाखला आता चांगलाच महागला आहे. राज्य शासनाने जन्म - मृत्यू नोंदणीच्या शुल्कात थेट १० पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भातील आदेश काढण्यात आला आहे.
या नवीन निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आता दाखल्यांसाठी जास्तीचे शुल्क मोजावे लागणार आहे.
जन्म, मृत्यू दाखला हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा प्रवेश, [Aadhaar Card Redacted], पासपोर्ट आणि सरकारी योजनांसाठी जन्मदाखला, तर वारसाहक्क, मालमत्ता हस्तांतरण, बँकेची कामे आणि विमा दाव्यासाठी मृत्यू दाखला गरजेचा असतो.
जन्म किंवा मृत्यूचा दाखला ग्रामीण भागात ग्रामपंचायत आणि शहरी भागात नगरपालिकेकडून दिला जातो.
नागरिकांना वेळोवेळी या दाखल्यांची गरज भासते. पूर्वी जन्म किंवा मृत्यू दाखल्याच्या एका प्रतीसाठी नागरिकांना अवघे दोन रुपये शुल्क मोजावे लागत होते. आता शासनाने हे शुल्क थेट १० पटीने वाढवून २० रुपये प्रति प्रत असे निश्चित केले आहे.
वर्षांनुवर्षे जुने असलेले शुल्क दर अद्ययावत करणे, संगणकीकृत प्रणालीचा वाढता खर्च भागवणे आणि दस्तऐवजांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी ही दरवाढ केल्याचे सांगण्यात येत आहे. नोंदवही तपासणी करणे किंवा नाव शोधणे तसेच नोंद उपलब्ध नसल्याचा दाखला मिळवण्यासाठी आता पूर्वीपेक्षा अधिक म्हणजेच प्रतिवर्ष २० रुपये शुल्क मोजावे लागणार आहे.
एका वर्षाहून अधिक काळ उलटल्यानंतर जन्म - मृत्यूची नोंद करायची असल्यास आता उपविभागीय दंडाधिकारी यांची परवानगी आवश्यक असणार आहे.
"जन्म आणि मृत्यूचा दाखला हा प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शासनाने शुल्कात वाढ केल्यामुळे आणि उशिराच्या नोंदीसाठी कडक नियम केल्यामुळे, नागरिकांनी विनाकारण अतिरिक्त शुल्क आणि दंड टाळण्यासाठी वेळेतच नोंद करून दाखले प्राप्त करून घ्यावेत."
- सचिन पाटील, नाशिक