

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तब्बल ६, १६२ कोटी ७८ लाख रुपये खर्चाच्या ६८ महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. नगर विकास विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला असून कुंभमेळ्यासाठी आवश्यक रस्ते, घाट, पाणीपुरवठा, वाहतूक, सुरक्षा आणि तांत्रिक सुविधांच्या उभारणीला मोठी चालना मिळणार आहे. शासन निर्णयानुसार टप्पा-१ आणि टप्पा-२ मधील २५ कोटी रुपये व त्यापेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ४४ प्रकल्पांसाठी ३,५९२.३० कोटी रुपये, १६ प्रकल्पांसाठी १,५०७.२८ कोटी रुपये आणि ८ प्रकल्पांसाठी १,०६३.२० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सिंहस्थांतर्गत नाशिक महारपालिकेमार्फत शहरातील प्रमुख मार्गाचे रुंदीकरण आणि विकास करण्यात येत आहे. वडनेर गेट ते विहितगाव, गंगापूर रोड, त्र्यंबक रोड, नांदूर पूल ते जत्रा हॉटेल, पेठ रोड, दिंडोरी रोड यांसारख्या महत्त्वाच्या मार्गाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला आहे. कुंभमेळ्यातील वाहतूक व्यवस्थापन आणि घाटांपर्यंतची पोहोच सुलभ करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. सुरक्षा आणि व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रणाली आणि स्मार्ट सिटी घटकांसाठी ३७१.७० कोटी रुपये, तसेच नाशिक-त्र्यंबकेश्वर नेटवर्क बॅकबोन उभारणीसाठी १२८.९८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे मेळ्याचे डिजिटल निरीक्षण आणि नियंत्रण अधिक प्रभावी होणार आहे. शासनाने सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून खर्चात अवाजवी वाढ होऊ नये, प्रकल्पांची पुनरावृत्ती टाळावी आणि आवश्यक तांत्रिक व आर्थिक तपासणी करूनच अंतिम मंजुरी द्यावी, असे स्पष्ट केले आहे. मंजूर निधी प्रकल्पनिहाय टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात येणार आहे.
पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधांना प्राधान्य
विल्होळी येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारणे, पाणीपुरवठा यंत्रणा मजबूत करणे तसेच साधुग्रामपर्यंत मुख्य गुरुत्ववाहिनी टाकण्याच्या कामासाठी जवळपास ३९५.७८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्र्यंबकेश्वर शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजनाही मंजूर करण्यात आली आहे.
गोदावरी घाटांचे विस्तारीकरण
कुंभस्नानासाठी गोदावरी नदीवरील विविध ठिकाणी नवीन घाट उभारणे आणि विद्यमान घाटांचा विकास करण्यासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. टाकळी, ओढा, दसक परिसर तसेच त्र्यंबकेश्वर येथे नवीन घाट, नदीकाठ विकास आणि परिसर सुशोभीकरणाची कामे हाती घेतली जाणार आहेत.