

नाशिक : पालकमंत्री आणि कुंभमेळ्याचा काहीही संबंध नाही. अमृतस्नानाची परंपरा लाखो वर्षांपासून सुरू आहे. पालकमंत्री येतात- जातात. ते नसले, तरी काही अडलंय का? असा सवाल करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, पालकमंत्र्यांची नियुक्ती नसली, तरी काही काळजी करू नका, असा विरोधकांना टोला लगावला.
गिरीश महाजन कुंभमेळामंत्री म्हणून कार्यरत असून, इतर मंत्रीही साथ देत आहेत. ते सगळे करतील. कमी पडले, तर आम्हीदेखील आहोत, अशा पद्धतीने आश्वस्त करत, फडणवीस यांनी पालकमंत्री पदाच्या नियुक्तीत राजकारण आणू नका, असा सल्ला देत पालकमंत्री पदाबाबत सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
सिंहस्थ कुभमेळा आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी कुंभमेळ्यातील अमृतस्नानाचा मुहूर्त मिळाला, पण नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी कधी मुहूर्त लागणार? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा फडणवीस म्हणाले की, पालकमंत्र्यांअभावी काही अडलंय का? पालकमंत्री नव्हे, तर अमृतस्नान अत्यंत महत्त्वाचे आहे. कुंभमेळामंत्री आहेतच. सोबत शिक्षणमंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री नरहरी झिरवाळ हे आमचे मंत्री आहेत. शिवाय आम्हीदेखील आहोत. त्यामुळे काळजी नसावी, असेही त्यांनी सांगितले. आपले हे धार्मिक आणि सांस्कृतिक अशा प्रकारचे हे पर्व आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी महाजन यांच्या खांद्यावर कुंभमेळ्याची सर्व जबाबदारी सोपवली. कुंभमेळामंत्री महाजन हे सगळे करतील असे स्पष्ट करत त्यांनी जणू कुंभमेळ्यात महाजनच सर्वेसर्वा असतील, असे संकेत दिले.