

नाशिक : महाराष्ट्रातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर घडवण्याची संधी मिळावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्यामार्फत २०२५-२७ या कालावधीसाठी जेईई आणि नीट प्रवेश परीक्षांचे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० जुलै २०२५ आहे.
मागील वर्षाच्या बार्टीच्या या उपक्रमाचा अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला होता. ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणासाठी देशातील प्रतिष्ठित महाविद्यालयात प्रवेश मिळाविला. यंदा या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ मिळावा यासाठी प्रबोधन बहुद्देशीय संस्थेने नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि कोल्हापूर येथे मोफत हेल्प डेस्क आणि मार्गदर्शन केंद्रे स्थापन केली आहेत. या केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले जाईल आणि अर्ज प्रक्रियेत मदत केली जाईल. अनुसूचित जातींतील विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी आहे. आमच्या मार्गदर्शन केंद्रांना भेट देऊन विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपले करिअर घडवावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुनील पाटील यांनी केले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विभागीय स्तरावर जेईई आणि नीटसाठी प्रत्येकी 150 जागा उपलब्ध आहेत. प्रशिक्षण मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती आणि नागपूर येथील केंद्रांवर होईल. या प्रशिक्षणाचा कालावधी 2 वर्षांचा असणार आहे. प्रशिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना दरमहा ६,००० रुपये स्टायपेंड आणि पुस्तकांसाठी एकाचवेळी ५,००० रुपये दिले जाणार आहेत.
हा कार्यक्रम अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे. अर्जदाराने २०२५ मध्ये दहावी उत्तीर्ण केलेली असावी, महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असावे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असावे. अशी पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे. निवड प्रक्रिया दहावीच्या गुणांवर आधारित असेल, आणि आरक्षण निकषांचे पालन केले जाईल. प्रशिक्षणादरम्यान ७५ टक्के हजेरी बंधनकारक आहे.