

Bomb Threat Bhusawal Railway Station:
मुंबई-चेन्नई-कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या महत्त्वाच्या महानगरी एक्स्प्रेस मध्ये बॉम्ब असल्याच्या संशयास्पद मेसेजमुळे आज मध्य रेल्वेच्या संपूर्ण मार्गावर मोठी खळबळ उडाली आहे. एक्स्प्रेसच्या एका डब्याच्या शौचालयात 'पाकिस्तान झिंदाबाद', 'आयएसआय' (ISI) यांसारखी देशविरोधी वाक्ये लिहिलेली आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणा तातडीने कामाला लागल्या असून, सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सदरची गाडी नऊ वाजेला तपासणी करून भुसावळ स्थानकावरून पुढील मार्गासाठी मार्गस्थ झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, महानगरी एक्स्प्रेसच्या एका डब्यातील स्वच्छतागृहात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धमकीवजा संदेश लिहिला होता. या संदेशात 'पाकिस्तान झिंदाबाद', 'आयएसआय' या दहशतवादी संघटनांच्या नावांचा उल्लेख होता, तसेच गाडीमध्ये बॉम्ब असल्याची गंभीर सूचनाही देण्यात आली होती. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हा मेसेज सुरक्षा यंत्रणांच्या निदर्शनास येताच, सर्वत्र हाय अलर्ट घोषित करण्यात आला.
या घटनेच्या गंभीरतेमुळे भुसावळ रेल्वे स्थानक येथे विशेष दक्षता घेण्यात आली. महानगरी एक्स्प्रेस भुसावळ स्थानकावर 8.30 वाजता दाखल होताच, रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि लोहमार्ग पोलीस (GRP) यांच्या संयुक्त पथकाने तातडीने कारवाई सुरू केली. श्वान पथक आणि बॉम्ब शोधक पथकांना पाचारण करण्यात आले.
संपूर्ण एक्स्प्रेसच्या प्रत्येक डब्याची, सामान ठेवण्याच्या जागेची आणि प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी करण्यात आली. प्रवाशांची चौकशी करून संशयास्पद हालचालींवर बारीक नजर ठेवण्यात आली.
हा संदेश खोडसाळपणाचा भाग आहे की, त्यामागे कोणताही मोठा कट आहे, याचा तपास सुरक्षा यंत्रणांनी सुरू केला आहे. या घटनेमुळे जळगावसह संपूर्ण रेल्वे परिसरात प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुरक्षा यंत्रणांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, तपास पूर्ण होईपर्यंत हाय अलर्ट कायम राहणार आहे.
सदरची माहिती ही दादर रेल्वे स्टेशनला मिळाली होती. त्यापासून सगळे स्टेशन हाय अलर्टवर वर होते. गाडीमध्ये कुठेतरी पाकिस्तान जिंदाबाद आय एस आय असे लिहिली होती मात्र ती कुणीतरी पुसून टाकलेलं होतं. भुसावळ स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाच्या बीडीएस स्कॉडने संपूर्ण गाडीची तपासणी केली. त्यानंतर सकाळी 9 वाजता भुसावळ स्थानक वरून गाडी रवाना करण्यात आली आहे अशी माहिती भुसावळ रेल्वे स्थानकाचे रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक पी. आर. मीना दिली.