

नाशिक : भक्ती, श्रद्धा आणि मानवांचा सर्वात मोठा मेळा म्हणून जगात ओळख असलेल्या कुंभमेळ्याला प्रयागराज येथे सोमवारी (दि.१३) प्रारंभ झाला. त्यात कुंभनगरी नाशिक येथून सुमारे ५० साधू-महंत मंगळवारी (दि. १४) होणाऱ्या पहिल्या पर्वणीचे शाहीस्नान करणार आहेत.
उत्तर प्रदेशातील प्रयाग राज येथे गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या संगमावर ४५ दिवस कुंभमेळा होणार आहे. मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर मंगळवारी (दि.१४) पौष पौर्णिमेपासून सुरू झालेल्या कुंभमेळ्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील विविध आखाड्यांतील ५० हून अधिक साधू-महंत सहभागी झाले असून, मंगळवारी होणाऱ्या पर्वणीत ते शाहीस्नान करणार आहेत. देशभरातील साधू-महंत आणि जगभरातील भाविक कुंभमेळ्यात पावन पर्वणीत स्नान करण्यासाठी येणार असून, त्यानिमित्त कुंभनगरी प्रयागराज सजले आहे. उत्तर प्रदेश राज्य शासनातर्फे येथे साधू-महंतांची येथे उत्तम व्यवस्था करण्यात आली असून, शाहीस्नानाच्या पर्वणीच्या पूर्वसंध्येला साधू-महंतांमध्ये प्रचंड उत्साह, भक्तिभाव आणि आनंदाचे वातावरण असल्याची माहिती कुंभमेळ्यात सहभागी पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तिचरणदास यांनी दिली.
गेल्या महिनाभरापासून आम्ही साधू-महंत प्रयागराज येथील कुंभमेळ्यात पावन स्नानाची पर्वणी साधण्यासाठी आलो आहोत. उद्या होणाऱ्या शाहीस्नानासाठी प्रयागराज सज्ज झाले असून, त्यासाठी नियोजन सुविधा चोख ठेवण्यात आल्या आहेत.
- महंत भक्तिचरणदास महाराज, पंचमुखी हनुमान मंदिर, पंचवटी, नाशिक
त्र्यंबकेश्वर येथील सर्व 10 आखाडयांचे महंत, साधू हे प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात सहभागी झाले आहेत. सर्व आखाड्यांमध्ये केवळ पूजेसाठी एक- दोन साधू वगळता अन्य सर्वांचा मुक्काम मागील 15 दिवसांपासून प्रयागराज कुंभनगरीत आहे.
प्रयागराज कुंभनगरीत सोमवारी (दि. १३) शाकंभरी पौर्णिमेपासून कुंभपर्वाला प्रारंभ झाला. सोमवारी सकाळी सूर्याने मकर राशीत प्रवेश केला व तेव्हापासून कुंभमेळा पर्वकाल सुरू झाला आहे. मकर संक्रातीनिमित्त मंगळवारी (दि. 14) पहिले शाही स्नान होणार आहे. तपोनिधी श्री पंचायती आनंद आखाड्याचे अध्यक्ष श्रीमहंत शंकरानंद महाराज यांनी प्रयागराज कुंभनगरीतून संवाद साधत ही माहिती दिली. पहाटे 5 ला सर्वप्रथम महानिर्वाणी आणि अटल आखड्याची शाही मिरवणूक निघेल. त्यानंतर निरंजनी आणि आनंद आखाड्यांची मिरवणूक निघेल. त्यानंतर जूना आखाडा, अग्नी आखाडा व आवाहन आखाडा यांची शाही असेल. त्यानंतर बडा उदासीन, नया उदासीन व निर्मल आखाडा यांच्या शाही मिरवणुका निघतील.
दरम्यान, सर्व आखाड्यांचे छावणी प्रवेश यापूर्वीच झाले आहेत. शनिवारी निरंजनी आखाड्याचा छावणी प्रवेश झाला. त्यावेळी निघालेली मिरवणूक लक्षवेधी होती. त्र्यंबकेश्वर येथील श्रीराम शक्तिपीठ संस्थानचे श्रीश्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांची उपस्थिती होती. त्यांच्यासमवेत महंत श्रीनाथानंद सरस्वती, महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती, महंत सुदर्शनानंद सरस्वती, महंत रामानंद सरस्वती, महंत विश्वेश्वरानंद सरस्वती, महंत शिवानंद सरस्वती उपस्थित होते.