

कळवण (नाशिक) : तालुक्यातील जयदर सब स्टेशनवरून अंबापूर, वरखेडा, करमाळा यांसह काही आदिवासी पाड्यांवर केंद्र सरकारच्या आरडीएसएस योजनेअंतर्गत नवीन विद्युत मेनलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र या कामात मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा होत असल्याचे आता उघड झाले आहे. अंबापूर परिसरात अवघ्या आठ दिवसांत दोन विद्युत खांब कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, उभारण्यात येणारे खांब हे पोकळ, कमकुवत व निकृष्ट असून त्यांना योग्य ते मजबुतीकरणच दिले गेलेले नाही. त्यामुळे अजून वीजपुरवठा सुरू होण्याआधीच खांब कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. भविष्यात या खांबांवरून वीजप्रवाह सुरू झाल्यानंतर दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण राहणार? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
सध्या राज्य मार्ग क्रमांक २१ वरून विद्युत लाईनचे काम सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही कडेला खांब उभारण्यात येत आहेत. मात्र हे काम सुरू करताना सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा जिल्हा परिषदेच्या रस्ते विभागाची परवानगी घेतली आहे का? हा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे. भविष्यात जर रस्त्याचे रुंदीकरण करावे लागले तर हे खांब रस्त्यात अडथळा ठरणार नाहीत का? याची दखल घेतलेली नाही.
सापुतारा -कनाशी मार्गावरील वरखेडा फाटा ते जयदर, अर्जुन सागर मार्गावरही खांब उभारण्यात आले आहेत. पण हे काम करताना सिमेंट, दगड किंवा वाळू यांचे मजबुतीकरण न करता फक्त दगडगोटे व मातीने खड्डे बुजवण्यात आले आहेत. पावसामुळे माती सरकून खांब कोसळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी खांब कोसळण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदारावर गंभीर आरोप केले असून काम निकृष्ट दर्जाचे केल्याचा ठपका ठेवला आहे. आरडीएसएस योजनेचे उद्दिष्ट चांगले असले तरी त्याची अंमलबजावणी ढिसाळ पद्धतीने होत आहे. भविष्यात जर अपघात झाले तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
या संपूर्ण कामावर देखरेख करणाऱ्या महावितरण कंपनीच्या संबंधित विभागांनी अद्याप काहीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. ठेकेदाराने भविष्यातील रस्त्यांचे नियोजन, मजबुतीकरणाची गरज आणि सुरक्षा याचा विचार केला नसल्याची बाब प्रकर्षाने पुढे येत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून कामाची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.