नाशिक : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मधाचे गाव निर्माण करण्याची योजना असून याअंतर्गत जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चाकोरी हे गाव 'मधाचे गाव' म्हणून निर्माण करण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून युद्धपातळीवर हालचाली सुरु आहेत. मंडळाकडून मध खरेदीला पहिल्यांदाच 500 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला असून, मधासाठी हमीभाव जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशात पहिले राज्य ठरले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे यांनी दिली.
नाशकातील उंटवारीरोड परिसरातील संभाजी चौकातील प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या 27 कर्मचार्यांना कार्यक्षमता वाढीचे दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी अध्यक्ष रवींद्र साठे नाशकात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
साठे म्हणाले की, खादी व ग्रामोद्योग मंडळाचा मुख्य व्यवसाय मधोत्पादन असून, त्यासाठी मंडळाकडून प्रत्येक जिल्ह्यात मधाचे गाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव तसेच शेतकरी वर्गाला रोजगार उपलब्ध होणार आहे. 2022मध्ये महाबळेश्वर येथील मांघर तालुक्यात, कोल्हापूरमध्ये पारगाव, पालघरमध्ये घोलवड, नांदेडमध्ये भंडारवाडी याठिकाणी 'मधाचे गाव' निर्माण करण्यात आले आहे.
साठे पुढे म्हणाले की, 'हर घर तिरंगा' मोहिमेंतर्गत शासनाने मंडळाकडे25 हजार राष्ट्रध्वजांची मागणी नोंदविली आहे. मंडळाकडून 'हर घर खादी, घर घर खादी' नारा देण्यात आला आहे. मंडळाकडून प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमजीपी), मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमजीपी), प्रधानमंत्री विश्वकर्मायोजना राबविण्यात येत असून, 50 लजाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याचबरोबर मुंबईत 13 ऑगस्ट रोजी मंडळाचा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. 21 ते 23 ऑगस्टदरम्यान मंत्रालयात खादीचे प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
त्र्यंबक तालुक्यात चाकोरी गावात मधोत्पादनासाठी अनुकूल हवामान असून, येथील मधपाळ मोठ्या संख्येने मधमाशी पालन करतात. मधाचे गाव निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व निकष या गावाकडून पूर्ण करण्यात येत असल्याने याठिकाणी मंडळाकडून मधाचे गाव निर्माण करण्याच्या हालचाली सुरु आहेत. या अंतर्गत शुद्ध सेंद्रीय मधासाठी प्रयोगशाळा, सेल्फी पॉईंट, मधुबन, गावात कमान, मधविक्री केंद्राची स्थापना करण्यात येईल अशी माहिती यावेळी अध्यक्ष साठे यांनी दिली.