

सिडको (नाशिक) : अंबड एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकी हद्दीत दोन लहान बालके रडत बसलेली आढळून आल्याने, पोलिसांनी तत्परता दाखवत त्यांच्या आईचा शोध घेऊन ती दोघांनाही तिच्या स्वाधीन केली. पोलिसांच्या समयसुचकतेमुळे ही दोघे चिमुकले पुन्हा आईच्या कुशीत विसावली. आपल्या आईच्या शोधासाठी ही दोन मुले घरातून बाहेर पडून रस्ता चुकली होती.
सोमवारी (दि.30) सकाळी १० वाजता एका कंपनीजवळ तीन वर्ष आणि दोन वर्षाचे दोन चिमुकले गवतामध्ये रडत बसल्याचे आढळल्यानंतर कंपनीतील कामगारांनी त्यांना चुंचाळे पोलीस चौकीत आणले. मुले लहान असल्यामुळे नाव किंवा पत्ता सांगू शकत नव्हती. पोलिस उपनिरीक्षक संदीप शेवाळे, मुक्तेश्वर लाड, पोलिस हवालदार सोनवणे, साळवे, पोशि दिवे व सूर्यवंशी यांनी दोन पथकांमार्फत या मुलांचे फोटो तब्बल २० ते २५ कंपन्यांमध्ये जात कामगारांना दाखविले. अखेर एका कंपनीत मुलांची आई काम करत असल्याची माहिती मिळाली. तिला चौकीत आणून चौकशीनंतर तिची दोन्ही मुले तिच्या ताब्यात देण्यात आले. दोघेही पालक कामावर जात असल्याने घरी मुलांची देखभालीसाठी कोणीही नसल्याने ही घटना घडली. अशा घटना टाळण्यासाठी मुलांच्या खिशात पत्ता व मोबाईल क्रमांक ठेवावा, तसेच शेजाऱ्यांना माहिती द्यावी, अशा सूचना पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी दिल्या.