

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्रात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून घालण्यात आलेल्या बंदीमुळे खाद्यतेल व्यापारी तसेच सर्वसामान्य ग्राहकांमध्ये निर्माण झालेली अडचण अखेर दूर होण्याची चिन्हे आहेत.
सरसकट बंदीचा निर्णय झालेला नसून, भेसळ रोखतानाच पारंपरिक तेल विक्रेते आणि किरकोळ स्वरूपात तेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. या भूमिकेचे महाराष्ट्र चेंबरने स्वागत केले आहे.
सुट्या खाद्यतेलाच्या बंदीच्या निर्णयामुळे राज्यातील हजारो व्यापारी आणि ग्राहक अडचणीत आले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र चेंबरने अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाच्या भूमिकेला पाठिंबा देत, शासनाने निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी केली होती.
महाराष्ट्र चेंबर अध्यक्ष रवींद्र माणगावे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. २३) अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाने राज्यस्तरीय व्यापारी मेळावा घेतला होता. मेळाव्यात शासनाने सुट्या खाद्यतेलावरील बंदीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली होती.
यापूर्वी महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा आणि उपाध्यक्ष सुनीता फालगुने यांनीही चेंबरची भूमिका शासनासमोर मांडली होती. शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवित निर्णय मागे घेण्यासाठी सरकारला १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. मागणी मान्य न झाल्यास, न्यायालयात धाव घेण्याबरोबरच रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला होता.
दरम्यान, उपाध्यक्ष फालगुने यांच्या नेतृत्वाखाली तेल व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन व्यापाऱ्यांच्या अडचणी मांडल्या होत्या तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत झालेल्या चर्चेतही सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील निर्बंधांमुळे व्यापारी आणि सर्वसामान्य ग्राहकांवर होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधले.
भेसळ रोखणे आवश्यक असले, तरी त्यासाठी सर्वच व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना एकाच मापाने मोजणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका व्यापाऱ्यांची होती. त्यामुळे भेसळ रोखण्यासाठी आणि संबंधितांवर अन्याय टाळण्यासाठी आदर्श कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केलेली भूमिका व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.
या राज्यस्तरीय मेळाव्याला अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर ठक्कर, उपाध्यक्ष प्रकाश पटेल, राष्ट्रीय महामंत्री तरुण जैन, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुभाष ठक्कर, पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष हितेश कपाडिया (कोल्हापूर), विदर्भ उपाध्यक्ष पीयूष जैन, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष कचरूबाळ वेळूंजकर, भूपेंद्रसिंग रेकी, विनोद परमार यांच्यासह विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व व्यापारी सहभागी झाले होते.