

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शेकडो महिलांच्या लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या आरोपांमुळे अटकेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नव्या घडामोडी समोर येत आहेत. खरातची पत्नी कल्पना खरात हिच्याविरोधात शिर्डी पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे तिच्या परदेशात पलायनाचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे.
अशोक खरातविरुद्ध विविध ठिकाणी गुन्हे दाखल होत असताना अनेक पीडित महिला पुढे येत आहेत. फसवणूक, आर्थिक व्यवहार आणि सावकारीच्या प्रकरणांत त्याचे नाव समोर आले आहे. या व्यवहारांत कल्पना खरातचाही सहभाग उघड झाल्याने तिच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला.
मात्र, गुन्हा दाखल होताच ती फरार असून, पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे. दरम्यान, ती खरात परदेशात पळून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन शिर्डी पोलिसांनी तातडीने लुकआउट नोटीस जारी केली आहे.
या नोटीसमुळे देशातील सर्व विमानतळांवर सतर्कता वाढवण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीला विदेश प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी अशोक खरातदेखील परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली होती.
मात्र, पोलिसांनी वेळीच कारवाई करत त्याला अटक केली होती. शिर्डीतील चार एकर भूखंडाच्या खरेदी-विक्री प्रकरणात फसवणूक केल्याचा आरोप खरात कुटुंबावर आहे. मूळ जमीनमालक रावसाहेब गोंदकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्जाच्या नावाखाली जास्तीचे व्याज लावून सावकारीच्या जाळ्यात अडकवून जमीन बळकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अशोक खरात, कल्पना खरात यांच्यासह अरविंद बावके, किरण सोनवणे आणि अशोक तांबे यांच्यावर फसवणूक व सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल आहे. सध्या पोलिसांकडून कल्पना खरातचा शोध सुरू आहे. लवकरच तिला अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.