

देवळाली कॅम्प : लोहशिंगवे येथील लहवित रेल्वेस्थानक परिसरातील मोरीजवळ प्रस्तावित पादचारी भुयारी मार्ग विस्तारीकरणाला रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. या ठिकाणी मूळ प्रस्तावित २.६५ मीटर × २.५० मीटर आकाराऐवजी ३.५० मीटर × ३.५० मीटर आकाराचा भुयारी मार्ग बांधणे तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार खासदार राजाभाऊ वाजे यांनी दि. १२ आणि १८ सप्टेंबर रोजी रेल्वे प्रशासनाकडे भुयारी मार्गाच्या आकाराबाबत पत्रव्यवहार करीत विचारणा केली होता. या पत्रानंतर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने स्थानिक नागरिक व ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत संयुक्त स्थळपाहणी करीत प्रस्तावित भुयारी मार्गाच्या विस्तारित आकाराची तांत्रिक व्यवहार्यता तपासली होती.
उभारणीच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगती
मध्य रेल्वेचे अपर मंडल रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) प्रवीण कुमार पाठक यांनी दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी खासदारांना पाठविलेल्या पत्रात ३.५० मीटर × ३.५० मीटर आकाराचा पादचारी भुयारी मार्ग बांधणे तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या विस्तारित भुयारी मार्ग उभारणीच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे.
जलनिस्सारण व्यवस्था महत्त्वाची
भुयारी मार्गाच्या उभारणीसाठी रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंना पोहोच मार्ग तयार करून ते विद्यमान रस्त्यांच्या जाळ्याशी जोडणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित स्थानिक प्राधिकरणे आणि इतर भागधारकांशी समन्वय साधण्यात येणार आहे. याशिवाय, भुयारी मार्गाच्या परिसरात पावसाचे पाणी तसेच इतर पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक जलनिस्सारण व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी संबंधित खासगी जमीनमालकांशी समन्वय साधून उंचावरील भागाकडून जलनिस्सारणाची पाइपलाइन टाकण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. विस्तारित भुयारी मार्गाची उभारणी झाल्यास, स्थानिक नागरिक आणि रेल्वे प्रवाशांना सुरक्षित व सोयीस्कर ये-जा करण्यास मदत होणार आहे.