Life Without Water | 11 हजार विद्यार्थ्यांचा जीव पाण्याविना कासावीस

Nashik | फेब्रुवारीच्या मध्यावरच 25 आश्रमशाळांतील विहिरी, बोरवेलने गाठला तळ; टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ
नाशिक
विहिरींनी तळ गाठलाPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : आदिवासी विकास विभागांंतर्गत येणार्‍या पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक आणि सिन्नर या सहा तालुक्यांतील 25 आश्रमशाळा आणि दाेन वसतिगृहांतील विहिरी, बोरवेल यांनी फेब्रुवारीच्या मध्यावरच तळ गाठल्याने सुमारे 11 हजार विद्यार्थ्यांचा जीव पाण्यावाचून कासावीस होत असल्याची बाब आढावा बैठकीतून समोर आली.

आदिवासी विकास विभागातील नाशिक प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रमशाळांमधील पिण्याच्या पाण्याच्या सद्यस्थितीबाबत नाशिकचे प्रकल्प अधिकारी अर्पित चौहान यांनी शुक्रवारी (दि. 14) शबरी विकास महामंडळाच्या कार्यालयात आढावा घेतला. यात 25 आश्रमशाळा आणि दोन वसतिगृहांमधील 11 हजार विद्यार्थ्यांची पाण्याविना गैरसोय होत असल्याची बाब समोर आली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या. बैठकीला जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे भूजलतज्ज्ञ सर्वेक्षकही हजर होते. प्रकल्प अधिकारी चौहान यांनी आश्रमशाळांमध्ये पाण्याची सोय करण्यासाठी भूजल सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले.

पुढील आठ दिवसांत भूजल सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त होताच, जलजीवन योजनांच्या माध्यमातून या शाळांमध्ये जलयोजना राबविण्याचे आदेशही चौहान यांनी दिले. नाशिक प्रकल्पांतर्गत पेठ तालुक्यातील नऊ, दिंडोरी तालुक्यातील चार, त्र्यंबकेश्वरमधील पाच, इगतपुरीतील एक, नाशिकमधील चार, सिन्नरमधील एक या शाळा आणि त्र्यंबकमधील मुलींचे आणि मुलांचे अशा दोन वसतिगृहांत उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवते.

पेठमध्ये फेब्रुवारीतच बोरवेल आटले

पेठ तालुक्यांतील आंबेगाव शाळेला सार्वजनिक विहिरीवरून पाणीपुरवठा केला जातो. कोहोर येथील शाळेपासून चार किलोमीटर अंतरावर विहीर आहे. मीटर नादुरुस्त झाल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. खरपडी येथील आश्रमशाळेवरील विहिरीने तळ गाठला, तर बोरवठ येथे मार्च, एप्रिल, जूनमध्ये पाण्याची कमतरता भासते. म्हसगण येथे बोरवेल फेब्रुवारीतच बंद पडते. भुवन येथील शाळेत बोरवेलला पाणी नाही. चोळमुख येथील शाळेत पाइपलाइन योजना अपूर्ण आहे. आसरबारी आणि मुरंबी शाळांमध्ये बोरवेल केलेली आहे, पण पाणी नाही.

दिंडोरीत पाच किलोमीटर अंतरावर विहीर

दिंडोरीतील चार शाळांना पाणी नाही. ठेपणपाडा येथे पाच किलोमीटर अंतरावर विहीर आहे. नाळेगाव येथे गावातील विहिरीवर करार केला आहे. बोपेगाव येथे दोन किलोमीटरवर विहीर आहे परंतु सर्व शेतकरी मिळून एकच विद्युत रोहित्र असल्याने त्यावर अधिक भार पडत असल्यामुळे नेहमीच वीज खंडित होत असते. टिटवे येथे विहीर आहे पण फेब्रुवारी, मार्चमध्ये विहिरीला पाणी नाही.

त्र्यंबकमध्ये विहिरींनी गाठला तळ

त्र्यंबकमधील सहा शाळांना पाणी नसल्याने विद्यार्थी त्रस्त आहेत. ठाणापाडा येथे विहिरीला पाणी नाही. देवडोंगरा येथे बोरवेल आहे, तर पाणी नाही. शिरसगाव येथे शेतकर्‍याच्या शेतातील विहिरीतून आश्रमशाळेला पाणीपुरवठा केला जातो. तोरंगण, बोरीपाडा, रायते या ठिकाणी विहिरींचे पाणी आटले आहे. नाशिक तालुक्यातील मुंढेगाव, देवरगाव, पिंपळगाव या ठिकाणीही अशीच परिस्थिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news