

खेडगाव : पुढारी वृत्तसेवा
यावर्षी सतत पडणाऱ्या पावसामुळे, द्राक्षबागेची काडी परिपक्व न झाल्यामुळे निम्म्याहून जास्त द्राक्षबागा फळाविना उभ्याच आहेत. काही शेतकऱ्यांनी बागा तोडून टाकल्या आहेत. निसर्गाच्या कचाट्यातून वाचलेल्या ५० टक्के बागांनाही कमी प्रमाणात फळधारणा झाली आहे. त्यामुळे यावर्षी द्राक्षपीक जेमतेम राहणार आहे. द्राक्षबागावर अवलंबून असलेल्या शेतमजुरांना यावर्षी रोजंदारीचा प्रश्न भेडसावत आहे. मागील वषपिक्षा यावर्षी कमी दरात मजुरांना काम करण्याची वेळ आली आहे.
साधारणपणे जानेवारीपर्यंत द्राक्षबागेची कामे पूर्ण होतात. परंतु, यावर्षी नोव्हेंबरमध्ये कामे आटोपल्याने शेतमजूर कामाच्या विवंचनेत आहेत. पुढील द्राक्ष काढणीचाही हंगाम हा महिनाभर जातो की नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतमजुरीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे आर्थिक अडचणीला सामोरे जाण्याची शक्यता आहे.
निफाड व दिंडोरी तालुक्यांत प्रामुख्याने पेठ, सुरगाणा व दिंडोरीच्या पश्चिम भागातील आदिवासी मजूर हंगामी शेतीकामासाठी येतात. परंतु, यावर्षी त्यांचे प्रमाण हे नगण्य असून, त्याचा परिणाम येथील बाजारपेठेच्या उलाढालीवर होत आहे. हंगामी मजूर आल्यानंतर आठवडे बाजार, खेड्यापाड्यातील व्यावसायिक, दुकानदारांचा व्यवसाय चांगल्या प्रमाणात होतो. परंतु, यावर्षी शेतमजूर नसल्याने त्याचा अनिष्ट परिणाम बाजारपेठांत दिसून येत आहे. सध्या मजुरांना काम नसल्यामुळे बाजारपेठेवर आर्थिक मरगळ आल्याचे दिसत आहे.