

वणी (नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावी शुक्रवारी (दि.8) मध्यरात्री दोन बिबट्यांनी पोल्ट्री फार्मच्या छतावर चढून सिमेंट पत्रे तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर शेतावरील मोगल वस्तीवर भरत दौलत मोगल यांच्या मालकीच्या पोल्ट्री फार्म अगदी घराजवळच असल्याने पत्रे तुटल्याचा आवाज झाल्याने सर्व बाहेर येऊन बघताच सर्वांना समोरील दृश्य बघून हादराच बसला. त्या ठिकाणी एक नव्हे तर चक्क दोन बिबटे पोल्ट्रीत घुसल्याचे आढळले. हे दोन्ही बिबटे झोपल्याच्या अवस्थेत पहुडले होते. मात्र फॉर्म मध्ये कोंबड्या नसल्याने मोठा अनर्थ टळून पशुधनाचे नुकसान झाले नाही.
श्रावण मोगल यांनी त्वरीत वणी वन विभागास माहिती दिली. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने तातडीने फॉरेस्ट कर्मचारी एस.एस कामडी वनरक्षक फोफशी व ज्ञानेश्वर वाघ वन रक्षक वरखेडा, हेमराज महाले, वाहन चालक बापू शिरसाठ हे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी ताबडतोब नाशिक येथे रेस्क्यू फोर्सला दूरध्वनी वरून माहिती दिली. त्यानुसार रेस्क्यू टीम प्रमुख वैभव महाले व त्यांचे सहकारी यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. वनविभागाचे पथक येईपर्यंत परिसरातील नागरिकांनी मोगल परिवारासह तिथेच रात्रभर थांबून पहारा दिला. शनिवार (दि.9) पहाटे चार वाजे दरम्यान एका बिबट्याला परिस्थितीचा अंदाज आला असल्याने त्याने पोल्ट्रीच्या भिंतीवरून पत्र्यावर चढून पळून गेला, तर दुसरा बिबट्या हा स्वैरभैर अवस्थेत तिथेच फिरत राहीला होता. ग्रामस्थ इकडे रेस्क्यू फोर्स येण्याची वाट बघत होते. मात्र फक्त दहा मिनिटाचा अवधी रेस्क्यू फोर्स तिथे पोहोचण्यापूर्वीच दुसरा बिबट्याही पसार होण्यास यशस्वी झाला आहे.
त्यामुळे ग्रामस्थांसह वनविभागाला हातावर हात ठेवून अवाक नजरेने बघण्या व्यतिरिक्त हातात काहीच पर्याय उरले नाही. रेस्क्यू फोर्सला इतक्या लांबून येऊन रीकाम्या हाताने परतावे लागले आहे. दोन्ही बिबटे पकडले गेले नाही, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण जैसे थे आहे. बिबटे पकडले जाणार की ही चिंता ग्रामस्थांना सतावत असून पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. वनविभागाने त्वरीत पिंजरे लाऊन बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वनविभागाचे वनरक्षक एस. एस. कामडी यांनी ग्रामस्थांना सांगितले की, लवकरच आम्ही या ठिकाणी पिंजरे लावणार आहोत.