

सटाणा : सुरेश बच्छाव
बागलाण तालुक्यात सद्यस्थितीत सर्वत्र बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शेतकर्यांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन रात्री पिकांना पाणी द्यावे लागत आहे. रात्रभर कुठे फटाके फोडून तर कुठे मोठ्या प्रमाणात उजेड आणि आवाज निर्माण करून बिबट्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, तरीही दररोज कुठे ना कुठे पाळीव प्राणी बिबट्यांच्या भक्षस्थानी पडत आहे.
बिबट्यांचा धुमाकूळ माजला असून त्या पार्श्वभूमीवर या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनेची गरज असल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले आहे. सटाणा शहरापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावरील औंदाणे, यशवंतनगर, मुंजवाड, पिंपळदर, खमताने परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या वाढीस लागली आहे.
दररोज कुठे ना कुठे पाळीव प्राणी किंवा भटक्या कुत्र्यांचा फडशा पाडला जात आहे. एवढेच नव्हे तर गुराखी आणि शेतकर्यांवरदेखील थेट हल्ला चढवण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आठवड्यातून तीन दिवस उपलब्ध होणारी वीजही तासभरही सलग आणि पूर्ण दाबाने मिळत नाही. त्यामुळे दिवसा मोटारी चालू शकत नसल्याने पिकांना पाणी देण्यासाठी नाईलाजास्तव शेतकर्यांना रात्री शेतात जावे लागत आहे.
परंतु बिबट्यांची भीती असल्याने शेतकर्यांना अक्षरश: जीव मुठीत घालून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. रात्री दहा वाजता थ्री फेज वीजपुरवठा येताच शेतकर्यांना सर्वप्रथम फटाके वाजवावे लागतात. त्यामुळे सर्वत्र शेत शिवारात दिवाळी असल्यासारखा धडामधूम आवाज सुरू होतो. सोबत उजेडासाठी बॅटरी आणि संरक्षणासाठी काठी घ्यावी लागत आहे. सटाणा शहराजवळ तर एकाच वेळी बछडांसह नर-मादी द़ृष्टीस पडत आहेत. या बिबट्यांचे मोबाइलमध्ये छायाचित्रण करून ते सोशल माध्यमातून व्हायरल केले जात आहे. शेतकरी अगदी सहजासहजी बिबट्यांचे फोटो काढू लागले आहेत. एवढेच नव्हे तर बहुतांश ठिकाणी भर दिवसाढवळ्यादेखील बिबट्या किंवा त्याच्या बछड्यांचे दर्शन होत असल्याने शेत शिवारात राहणार्या कुटुंबांमध्ये दहशत पसरली आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात जनावरे ठार झाल्यानंतर वनमजूर किंवा रोजंदारी कर्मचार्यांकडून पंचनामा केला जातो. त्यानंतर दोन-चार दिवसांनी एखादा पिंजरा आणून ठेवला जातो. त्या पिंजर्यात भक्ष्य स्थानिक शेतकर्यांनाच द्यावे लागते. याअर्थी बिबट्यांच्या प्रश्नी वनविभाग अतिशय उदासीन वागताना दिसतात. त्यामुळे एकीकडे जनतेचे जीव धोक्यात असताना प्रशासन मात्र अतिशय सुस्त असल्याचे बोलले जात आहे.