

दिंडोरी (नाशिक): दिंडोरी तालुक्यातील वनारे शिवारात मडकीजांब परिसरातील कमालेवस्तीजवळ धामन नदीच्या खोर्यात वनविभागाने लावलेल्या पिंजर्यात सोमवारी पहाटे 5 ते 6 च्या दरम्यान 5 वर्षीय नरबिबट्या सापडला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. वनारवाडी शिवारात घास कापण्यासाठी गेलेल्या युवतीवर हल्ला करणारा हाच बिबट्या असू शकतो असाही संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
गत आठवड्यात शनिवारी (दि.26) वनारवाडी शिवारात घास कापण्यासाठी गेलेल्या युवतीवर बिबट्याने तीव्र हल्ला केला होता. नातेवाईकांनी मोठ्याने आरडाओरडा करीत बिबट्याला पळवून लावले मात्र बिबट्याच्या हल्ल्यात युवती गंभीर जखमी झाल्याने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिकांनी वनविभागावर रोष व्यक्त केला होता. परिसरात बिबट्याचे सातत्याने दर्शन होत असून पाळीव जनावरांवर हल्ले होत आहे. काही महिन्यांपुर्वी गुराखी मुलाचाही मृत्यू याच परिसरात झाला होता. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग उपाययोजना करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत होता.
युवतीच्या मृत्यूनंतर वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी मोहीम हाती घेत वनारे शिवारात पाच ते सहा ठिकाणी पिंजरे लावले होते. येथील वनरक्षक अशोक काळे यांची टीम वनारे शिवारात सातत्याने गस्त घालीत होती. दरम्यान वनविभागाने मडकीजांब परिसरातील कमाले वस्तीजवळ धामन नदीच्या खोर्यात बिबट्याचे वास्तव्य असू शकते असा अंदाज बांधून वनविभागाने या भागात तीन दिवसांपासून पिंजरा लावला होता. पिंजर्यातील भक्ष्य पकडण्यासाठी हा नरबिबट्या पहाटे पाचच्या सुमारास पिंजर्यात शिरला अन अलगद पिंजर्यात अडकला. सकाळी आठच्या दरम्यान वनरक्षक अशोक काळे पिंजर्याची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना पिंजर्यात बिबट्या अडकल्याचे दिसले. दरम्यान बिबट्याला म्हसरुळ येथील टीटीसी सेंटरमध्ये आणण्यात आले असून वरिष्ठ अधिकार्यांच्या पुढील आदेशानंतर त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल अशी माहिती वनअधिकार्यांनी दिली.
पिंजर्यात अडकलेला बिबट्या शनिवारी युवतीवर हल्ला करणाराच आहे की दुसरा याबाबत अद्याप निश्चित समजलेले नाही. बिबट्याची तपासणी करुन याबाबत खात्री करण्यात येईल. पुढील दोन दिवसांत याबाबत वैद्यकीय अधिकार्यांकडून याबाबत वनविभागाला माहिती मिळेल. अद्यापही वनारे शिवारात बिबट्या असण्याची शक्यता आहे.ग ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी वनविभागाची बिबट्याला पकडण्याची मोहीम सुरुच राहील.
संतोष सोनवणे, सहाय्यक वनसंरक्षक, वनविभाग (पूर्व), नाशिक