

सिडको (नाशिक): पिंपळगाव खांब येथे पुन्हा एकदा बिबट्याचा खुलेआम वावर असल्याचे निदर्शनास आल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण असून शेतीमधील कामे करण्यासही अडचणी येत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या शेतावरील कुशल हरळ या मजुरावर शनिवारी दिनांक ३१ मे रोजी दुपारच्या वेळी बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र मजुराने प्रसंगावधान भावना राखत तात्काळ घराकडे धाव घेतल्याने बिबट्या मक्याच्या शेतात पळून गेला.
पिंपळगाव खांब येथे काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी ठार झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एका बंगल्याच्या आवारात चार बिबट्यांचा वावर असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले होते. त्यानंतर वनविभागाने या भागात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. गेल्या दोन महिन्यात या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झालेला नाही. त्यातच शनिवारी (दि.31) रोजी दुपारी पुन्हा एकदा बिबट्याचा खुले वावर स्थानिक शेतकऱ्यांच्या निदर्शनास आला. पिंपळगाव खांब जवळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांची शेती फॉर्म हाऊस आहे शनिवारी दुपारी त्यांचे बंधु विठोबा चुंभळे व नातू संस्कार चुंभळे शेतावर होते या वेळी दुपारी दिड वाजेच्या सुमारास मजूर कुशल हरळ हा शेतात खत टाकण्यासाठी जात असतांना शेतात झोपलेला बिबट्या जागा झाला व त्याने हरळ याच्यावर झडप घेतली या हरळ याने प्रसंगावधान राखत पुन्हा माघारी पळाले व बिबटया मकाच्या शेतात पळून गेला . या घटनेची माहिती शिवाजी चुंभळे यांनी माहिती दिल्यानंतर पोलिस व वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत .
पिंपळगाव खांब परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आले असल्याने शेतकऱ्यांनी शेतीचे कामे करताना काळजी घ्यावी. रात्रीच्या वेळी बाहेर फिरू नये व सतर्क रहावे. वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करावे.
शिवाजी चुंभळे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक