

दिंडोरी (शिंदवड) : तालुक्यातील शिंदवड येथे शुक्रवार (दि.28) रोजी द्राक्षबागेत मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले. मात्र, त्याच्या हल्ल्यात दोन वनकर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
भाऊसाहेब बरकले यांच्या शेतात जनावरांसाठी गवत कापताना मनोज वाघमारे याला गवतात बिबट्या आढळला. त्याने तत्काळ गावकऱ्यांना याबाबत माहिती कळवली. तसेच ग्रामपंचायत सदस्य अमोल बरकले यांनी वरखेडा बिटचे वनअधिकारी ज्ञानेश्वर वाघ यांना याची कल्पना दिली. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिल्याने वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
जखमी असूनही बिबट्या हळूहळू शरद बरकले यांच्या शेतातील द्राक्षबागेच्या व कांद्याच्या बांधावर जाऊन बसला. अधिकाऱ्यांनी पाहणी सुरू करताच बिबट्याने अचानक हल्ला केला. वनअधिकाऱ्यांनी संरक्षक जाळी पुढे करत बचाव करण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यात शांताराम शिरसाठ व आण्णा टेकनर हे कर्मचारी जखमी झाले आहेत. मात्र, त्यांनी जखमी अवस्थेतही धैर्याने बिबट्याला पकडून ठेवले.
बिबट्या आक्रमक होत असल्याने त्याला ताब्यात घेणे अवघड जात होते. त्यामुळे नाशिक येथून पशुवैद्यकीय तज्ज्ञांची टीम बोलवण्यात आली. त्यांनी बिबट्याला बेशुद्ध केले. त्यानंतर पिंजऱ्यात टाकून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. बिबट्याच्या पायाला दुखापत झाल्याने तो चालू शकत नव्हता तसेच उन्हामुळे तो आजारी पडला होता. त्याला सावलीत ठेवून सलाईन दिल्यानंतर ताप कमी झाला. त्यानंतर पुढील वैद्यकीय उपचारांसाठी बिबट्याला हलविण्यात आले आहे.
ही मोहिम यशस्वी करण्यात डॉ. हेमराज सुखवल, समर्थ महाजन, राकेश मोरे, उपवनसंरक्षक उमेश वावरे, सहाय्यक वनसंरक्षक संतोष सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील, वनपरिमंडळ अधिकारी रामचंद्र तुंगार, वनरक्षक आण्णा टेकनर, ज्ञानेश्वर वाघ, हेमराज महाले, जयराम शिरसाठ, शांताराम शिरसाठ, परसराम भोये यांच्यासह संपूर्ण वनविभागाचे मोठे योगदान होते. शिंदवडच्या तरुणांनीही या मोहिमेत मोठी मदत केली. त्यांच्या सहकार्याबद्दल ग्रामस्थांनी वनविभाग व रेस्क्यू टीमचे विशेष आभार मानले.ऱ्या
सकाळी आम्हांला समजले की, शिंदवड येथे जखमी बिबट्या दिसुन आला आहे. त्यानंतर आम्ही तात्काळ शिंदवड गाठले. बिबट्याला वनविभागाने पकडुन ठेवले होते. आम्ही बिबट्याला बेशुध्द केले. बिबट्याला 108 पर्यंत ताप होता व पायाला जखमा देखील होत्या. आम्ही सलाईन देवुन पुढील वैद्यकीय सेवेसाठी बिबट्याला उपचारासाठी हलविले आहे.
डॉ हेमराज सुखवल, दिंडोरी, नाशिक.
शिंदवड येथे जखमी बिबट असल्याचे समजले तात्काळ आमची टीम पोहचली.या रेस्कीवमध्ये यावेळी बिबटने प्रतिहल्ला केला यात आमचे दोघे कर्मचारी जखमी झाले उपचार सुरु असुन प्रकृती ठिक आहे.आमची रेस्कीव टीम जखमी बिबटवर देखील उपचार करत आहे.
सुशांत पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी दिंडोरी, नाशिक.