

देवळाली कॅम्प : लहवित रोडवर दोन दिवसांपूर्वी एका युवकावर बिबट्याने हल्ला करत जखमी केले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून वन विभागाने येथील विजय रामभाऊ पाळदे यांच्या मळ्यात पिंजरा लावला होता. त्यात अखेर बिबट्या जेरबंद झाला.
शेतकरी विजय पाळदे मंगळवारी (दि. 13) पहाटे उसाच्या शेतात जात असताना पहाटे बिबट्या जेरबंद झाला असल्याचे दिसून आले. ही माहिती मिळताच वन विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी सुमित निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंह पाटील, अशोक खानझोडे, अंबादास जगताप यांनी घटनास्थळी जाऊन पिंजरा ताब्यात घेऊन बिबट्याला नाशिक येथे हलविले. लहवित रोड परिसरात अजूनही बिबटे व लहान बछडे मुक्त संचार करत असून, त्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बिबट्याला बघण्यासाठी गर्दी
ज्या ठिकाणी बिबट्या जेरबंद झाला, त्या ठिकाणी पिंजऱ्याच्या अवती भवती नागरिकांनी एकच गर्दी व गोंधळ केला. गर्दी नियंत्रित करण्यासाठी स्थानिक पोलिस असणे गरजेचे होते. याच ठिकाणी जो पर्यंत वनविभाग पिंजरा नेत नाही, तो पर्यंत पोलिस तैनात असणे गरजचे असल्याचे काही सुज्ञ नागरिकांनी सांगितले.