

देवळाली कॅम्प: लहवित रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकला आहे. दोन दिवसांपूर्वी (11 जानेवारीला) एका तरुणावर झालेल्या हल्ल्यानंतर वनविभागाने तातडीने पावले उचलत लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या जेरबंद झाला. मात्र, परिसरात अजूनही इतर बिबट्यांचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.
लहवित रोडवरील विजय रामभाऊ पाळदे यांच्या मळ्यात वनविभागाने पिंजरा लावला होता. मंगळवारी (दि. १३) पहाटेच्या सुमारास पाळदे हे शेतात जात असताना त्यांना पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ याची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी सुमित निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंह पाटील, अशोक खानझोडे आणि अंबादास जगताप यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जेरबंद केलेल्या बिबट्याला सुरक्षितरित्या ताब्यात घेऊन पुढील प्रक्रियेसाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे.
बिबट्या पकडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पिंजऱ्याभोवती झालेल्या या गर्दीमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अशावेळी गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी उपस्थित राहणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया स्थानिक सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.
एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले असले तरी, परिसरात अजूनही काही बिबटे आणि त्यांचे बछडे मुक्तपणे संचार करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी वनविभागाने या भागात पुन्हा पिंजरा लावावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.