

चांदवड (नाशिक) : तालुक्यातील पूर्व भागातील दहेगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एका वृद्ध महिला बालंबाल बचावली आहे. महिलेचा जीव वाचला असून चेहऱ्यावरच बिबट्याने हल्ला केल्याने महिला गंभीर जखमी झाली असून तात्काळ नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दहेगाव शिवारातील कांद्याच्या खळ्यावर भडांगे कुटुंबीय देखरेख करत होते. शनिवारी (दि.23) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भडांगे कुटुंब झोपेत असताना, याचवेळी शिकारीच्या शोधात असलेल्या नरभक्षक बिबट्याने नर्मदा भडांगे यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेनंतर बिबट्याने पळ काढला असून या प्रसंगामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली असून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.