Leopard Attack | वर्षभरात बिबट्यांचा 282 पशुधनावर हल्ला; एक जण ठार, सहा जखमी

गावे, शहरांतही शिरकाव; मानव-बिबट्या संघर्षात वाढ
जानोरी, नाशिक
जानोरी : येथील संरक्षण प्रकल्पालगत लावलेला पिंजरा. (छाया : समाधान पाटील)
Published on
Updated on

जानोरी (नाशिक) : शहर आणि तालुक्यातील बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यांचे मानवी वस्तीवरील हल्ले हा चिंतेचा विषय झालेला आहे. ग्रामीण भागातच नव्हे, तर दिंडोरी, ननाशी, मोहाडी, खेडगाव आदी शहरांच्या वेशींवर बिबट्याने धडक मारली असून, तो भरदिवसा फिरताना दिसत आहे. वर्षभरात 282 पशुधनावर, तर सहा वेळा माणसांवर हल्ले केल्याने मानव-बिबट संघर्ष निर्माण होत आहे. त्यावर ठोस धोरण ठरवून हा संघर्ष होणार नाही असे करावे, अशी मागणी या विषयातील जाणकार करत आहेत. भविष्यात यातून आणखी अपघात होण्याचा धोका असल्याने त्वरित ठोस निर्णय घेण्याची मागणी होत आहे.

मानव-बिबट्या संघर्ष केवळ दिंडोरी परिसरातील नसून, जिल्ह्यात अनेक भागांत पोहोचला आहे. खरेतर वनक्षेत्र घटल्याने आणि सिंचन सुविधा वाढल्याने उसाचे क्षेत्रही वाढले आहे. त्यामुळे बिबट्यांना सुरक्षित अधिवास, मुबलक पाणी आणि शेतकऱ्यांचे पाळीव पशुधन, भटके श्वान यांमुळे बिबट्यांना खाद्य मिळत असल्याने या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अनेक वेळा मनुष्यांवरही हल्ले

तालुक्यात वाघड, करंजवण, लखमापूर, वरखेडा आदी परिसरांत ऊसतोड सुरू होताच बिबटे इतरत्र आश्रयाला फिरतात. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांवर तसेच वाहनधारकांवर हल्ला करीत आहे, मात्र शासन दरबारी हेलपाटे नको म्हणून किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तींनी तक्रारही दिलेली नाही. मागील महिन्यात वनारवाडी येथील एकावर हल्ला करत ठार केले आहे.

बिबट्यांची संख्याही अनिश्चित

एक बिबट्या साधारण रोज 15 ते 20 किलोमीटर अंतर परिसरात फिरत असल्याने तालुक्यात एकूण किती बिबटे आहेत, याची नोंद नाही, मात्र रोज तालुक्यात कुठे ना कुठे बिबट्याचे दर्शन होतच आहे.

परिसरात शेतीकामांना खोळंबा

परिसरात सध्या शेतांमध्ये पेरणी, निंदणी, कोळपणी, खते देण्याची कामे सुरू आहेत. यासाठी शेतकरी व मजुरांना शेतांमध्ये जावे लागते. धरण तसेच नदी परिसरात बिबट्याच्या भीतीमुळे मजूर शेतांमध्ये जाण्यास घाबरतात. महिला मजुरांनी तर बिबट्याची प्रचंड धास्ती घेतली आहे. पालखेड, लखमापूर, वनारवाडी आदी परिसरांत यापूर्वी बिबट्याने हल्ले केले आहेत. त्यामुळे आजही मजुरांच्या उरात धडकी भरते.

उपाययोजनांची गरज

  • संशोधन करून बिबट्यांचा डेटाबेस तयार करावा.

  • बिबटप्रवण क्षेत्रात जनजागृती व प्रबोधन व्हावे.

  • बिबटप्रवण क्षेत्रासाठी योजना करावी.

  • बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण आणावे.

  • पाळीव प्राणी, जनावरांचे गोठे बंदिस्त करावेत.

  • बाहेर जाताना हातात काठी ठेवावी, काठीला घुंगरू बांधावे.

तालुक्यात वनक्षेत्रालगतच्या गावांमध्ये पिंजरे लावले आहेत. वनविभागाच्या वतीने अनेक गावांमध्ये जाऊन जनजागृती केली आहे. ऊसतोडणी सुरू असल्याने बिबटे इतरत्र आश्रय घेतात. त्यामुळे सावधगिरी बाळगावी, पाळीव प्राणी बंदिस्त गोठ्यात बांधावे.

सुशांत पाटील, वनअधीक्षक, दिंडोरी, नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news