Legislative Assembly Elections : उद्योजकांना लागले आमदारकीचे वेध

तयारी जोरात : पक्ष नेतृत्वाकडे केली जातेय जोरदार लॉबिंग
Legislative Assembly Elections
Legislative Assembly Elections file photo
Published on
Updated on

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध अनेकांना लागले असून, ही मंडळी आतापाासूनच स्वत:च्या नावापुढे भावी आमदार अशी बिरुदावली लावून मिरविताना दिसत आहे. त्यात काही उद्योजकांचाही समावेश असून, इच्छुकांच्या रांगेत आपणही असल्याचे त्यांच्याकडून दाखवून दिले जात आहे. मात्र, तिकीट मिळविण्याचे मोठे दिव्य पार करावे लागणार असल्याने, इच्छुक उद्योजकांकडून पक्ष नेतृत्वाकडे जोरदार लॉबिंग केले जाताना दिसून येत आहे. (Entrepreneurs have turned their attention to the upcoming assembly elections)

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील महिन्यांत घोषित होण्याची शक्यता असल्याने, राजकीय मंडळींनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असून, आपलीच सत्ता येणार असल्याचा दावा या मंडळींकडून केला जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुती असा सामना रंगणार असल्याने नेतेमंडळींना जागा वाटपाची मोठी कसरत करावी लागणार आहे. नाशिक जिल्ह्यातील 15 ही विधानसभा मतदारसंघांत इच्छुकांची संख्या मोठी असून, कोणता मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार, हा मोठा प्रश्न आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक आखाड्यात उतरण्यासाठी काही उद्योजकही इच्छुक आहेत. विशेषत: नाशिक पश्चिम आणि सिन्नर विधानसभा मतदारसंघांत या इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यातील काहींनी प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवातही केली असून, ते प्रत्यक्ष भेटीगाठी, सभा, मेळावे तसेच विविध उपक्रमांतून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच मतदारसंघात होर्डिंग्ज लावून आपण इच्छुक असल्याचे दर्शवले जात आहे.

नाशिकमध्ये मंत्री किंवा एखादा बडा नेता आल्यास इच्छुक उद्योजक आवर्जून त्या ठिकाणी हजेरी लावत आहेत. एका इच्छुक उद्योजकाच्या मते, पक्षश्रेष्ठींनी आपणास कामाला लागण्याचे आदेश दिले असून, तिकीट आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा त्याच्याकडून केला जात आहे. तर अन्य एका इच्छुकाने आपणही तिकिटाच्या रेसमध्ये असून, नाशिकच्या विकासासाठी आपण केलेल्या कामाच्या आधारे पक्ष नक्कीच आपल्या नावाचा विचार करेल असा दावा केला आहे.

होर्डिंग्ज अन् सोशल मीडियाचा आधार

राजकारण अन् उद्योग ही दोन्ही क्षेत्र भिन्न असली, तरी उद्योजकांचे राजकारणाबाबतचे आकर्षण कधीच लपून राहिलेले नाही. त्यामुळे शहरातील जवळपास सर्वच औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी विविध राजकीय पक्षांशी निगडीत आहेत. हेच पदाधिकारी आता आगामी विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या या इच्छुकांकडून होर्डिंग्ज लावण्यासह साेशल मीडियावर जोरदार प्रचार सुरू झाला आहे.

नाशिक पश्चिम, सिन्नर मतदारसंघांत इच्छुक

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात जिल्ह्याच्या अँकर इंडस्ट्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातपूर आणि अंबड या औद्योगिक वसाहतींचा समावेश होतो. त्यामुळे या मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील इच्छुकांची संख्या अधिक आहे. तसेच सिन्नरमध्येही औद्योगिक क्षेत्र मोठे असल्याने, या मतदारसंघातही उद्योजकांमधून अधिक इच्छुक आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news