Lasalgaon News | लासलगावात खळबळ, गुंतवणूकदारांचा सुटतोय संयमाचा बांध

दामदुप्पट योजनेतील पीडितांचे टोकाचे पाऊल
Lasalgaon fraud
pudhari
Published on
Updated on

लासलगाव : ५० दिवसांत दामदुप्पट योजनेत ठगले गेलेल्या गुंतवणूकदारांच्या संयमाचा बांध सुटत आहे. नातेवाईक व मित्र परिवारासह गुंतवलेली रक्कम अडकल्याच्या विवंचनेत तरुणाने बुधवारी (दि. ३०) रात्री जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी त्याने गुंतवणूकदारांच्या ग्रुपवर 'सर्वांना माझा शेवटचा नमस्कार, मी जे काही स्वप्न पाहिले होते ते सतीश काळेमुळे... ' अशी पोस्टी केली होती. दोन दिवसांपूर्वीच एकाने माडसांगवीत विहिरीमध्ये उडी घेत आपली जीवनयात्रा संपविली. त्यामागेही फसवणुकीचेच कारण असल्याची चर्चा असून, यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

स्टार इन्स्पायर ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेडच्या योजनेतील काही गुंतवणूकदारांनी मंत्री छगन भुजबळ यांची दोन वेळा भेट घेत गाऱ्हाणे मांडले होते. भुजबळांनी पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांना या गुन्ह्यात जातीने लक्ष घालण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही दिलासादायक अशी कारवाई होत नसल्याच्या मानसिकतेतून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे का, असा सवाल गुंतवणूकदार करत आहेत.

४.१२ कोटींची मालमत्ता जप्त

५० दिवसांत दामदुप्पट योजना राबवून ५० लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोमनाथ गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुख्य सूत्रधार लिपिक सतीश काळेसह अनिता शिंदे, बाळू जाधव या संशयित आरोपींना आतापर्यंत अटक झाली आहे. या गुन्ह्यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत ८० ते १०० गुंतवणूकदारांनी पावत्या जमा करत तक्रार दिली असून, या पावत्यांनुसार चार ते पाच कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणाच्या तपासात एचडीएफसी बँकेतील तीन ते चार खात्यांमध्ये असलेली तीन कोटी ८६ लाख रुपयांची रक्कम, काळेचे वाहन अशी चार कोटी १२ लाख रुपयांची मालमत्ता रक्कम जप्त केलेली असून, संबंधितांच्या सहा गाळ्यांना सील केले आहे.

नातलग, सहभागीदारामार्फत पैशांची विल्हेवाट

दरम्यान, गेल्या नऊ ते दहा महिन्यांत हजारो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधींची रक्कम मिळवत सतीश काळेने संशयित पुतणे गौरव संजय काळे, सौरभ संजय काळे यांच्यामार्फत ही रोख रक्कम लंपास केली असल्याची माहिती आरोपींच्या जबाबातून उघड होत आहे. मुख्य आरोपी काळे यांचा अलिखित सहभागीदार विष्णू भागवत याच्या खात्यामध्ये आतापर्यंत पावणेआठ कोटी रुपये वर्ग केल्याचेही तपासात समोर आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे व पोलिस उपनिरीक्षक पवन सुपनर यांनी दिली आहे.

सुरक्षारक्षकाला केले संचालक

स्टार इन्स्पायर फर्ममध्ये एकूण चार संचालक असून, मुख्य संचालक योगेश काळे, बाळू जाधव आणि सतीश काळे यांच्या बंगल्यावर असलेले सुरक्षारक्षक गंगाराज मधुकर अहिरे आणि सुभाष मनोहर अहिरे यांनाही संचालक केले आहे. स्वतःला वाचवण्यासाठी काळेने केलेले प्रताप तपासात उघड होत आहेत.

२५ दिवस उलटूनही काळे फरार

योगेश काळेला पकडण्यासाठी राज्यभरात पोलिसांनी चक्रे फिरवली असून, तो देशाबाहेर पळून जाऊ नये यासाठी लूक आउट नोटीस काढण्यात आली आहे. गुन्हा दाखल होऊन २५ दिवस उलटून गेले, तरी हाती लागलेला नाही. अद्याप तो पोलिसांना का सापडत नाही, याबाबतही उलटसुलट चर्चेला गुंतवणूकदारांमध्ये वेग आला आहे.

जमापुंजी, हातउसनवार करत अनेकांनी गुंतवणूक केली होती. आता घेणेदार तगादा लावत असल्यामुळे गुंतवणूकदार व एजंट यांची कोंडी झाली आहे. त्यातून आत्महत्येसारखे पाऊल उचलले जात आहे. मात्र, यातून मार्ग काढण्यासाठी पोलिसांची, समाजसेवकांची मदत घ्यावी. अतिटोकाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन सर्व स्तरातून केले जात आहे.

तपास स्थानिक पोलिसांकडेच कसा?

गुंतवणूकदारांच्या पावत्यांमधून पाच कोटींपर्यंत फसवणुकीचा आकडा दिसत असताना प्रत्यक्षात एक कोटी नऊ लाख रुपयांपर्यंतच फसवणूक रेकॉडवर आली आहे. ३० लाखांवर फसवणूक झाल्यास गुन्हा हा तत्काळ आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग केला जातो. पण या गुन्ह्यात २५ दिवस उलटूनही अद्यापही स्थानिक पोलिसांकडे तपास कसा, असा प्रश्न या विषयातील कायदेतज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news