

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
दोन वर्षांपूर्वी चार हजार रुपयांचा टप्पा ओलांडलेला कांद्याचा दर पुन्हा एकदा चार हजारांपार गेला आहे. लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सप्टेंबर महिन्यात ४३५१ रुपये प्रतिक्विंटलचा सरासरी दर मिळत आहे. बाजारातील हा दर शेतकऱ्यांना समाधान देणारा असला तरी कांद्याच्या दराने तेजी पकडली आणि शेतकऱ्यांच्या हातातील कांदा मात्र संपत आला, अशी विरोधाभासी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मात्र, ही तेजी शेतकऱ्यांसाठी कितपत फायदेशीर ठरणार, हा प्रश्न आहे. हंगामाच्या सुरुवातीला दर कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक गरजेतून आणि कांदा खराब होण्याच्या भीतीने कमी दरातच कांदा विकून टाकला.
आता दर वाढले असताना त्यांच्या शेतमालाचा मोठा हिस्सा बाजारात येऊन गेलेला आहे. त्यातच यंदा बदलत्या हवामानाचा कांदा उत्पादनाला फटका बसला. पाऊस, वातावरणातील बदल आणि त्याचा कांद्याच्या प्रतवारीवर झालेला परिणाम, यामुळे बाजारात चांगल्या प्रतीचा कांदा मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे दरवाढीची संधी निर्माण झाली असली तरी या तेजीच्या काळात विक्रीसाठी कांदा शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे.
यंदा बदलत्या हवामानाचाही कांदा उत्पादनावर परिणाम झाला. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि तापमानातील चढ-उतारामुळे कांद्याची प्रत, टिकवणक्षमता आणि उत्पादनावर परिणाम झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बाजारात चांगल्या प्रतीच्या कांद्याची आवक मर्यादित राहिल्याने दराला आधार मिळत आहे. दर वाढले, पण कांदा संपला; त्यामुळे यंदाची कांदा तेजी शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई करणार की केवळ बाजारातील आकडा वाढवणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
कांद्याचा दर चार हजारांपार गेल्याने बाजारात तेजीचे चित्र दिसत असले, तरी सुरुवातीला कमी दरात विक्री केलेल्या शेतकऱ्यांसाठी ही तेजी काहीशी हुकलेली संधी ठरत आहे. गेल्या वर्षी ११९२ रुपयांच्या सरासरी दराने कांदा विकावा लागलेल्या शेतकऱ्यांना यंदाचा ४३५१ रुपयांचा दर दिलासा देणारा असला, तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा घेण्यासाठी त्यांच्या हातात पुरेसा कांदा उरलेला नाही.