

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरातील चढ-उतार सुरूच असून, सोमवारी लाल कांद्याला मिळालेल्या ५,०३१ रुपये प्रतिक्विंटलच्या कमाल दरात मंगळवारी २५० रुपयांची घसरण झाली. मंगळवारी लाल कांद्याला ४,७८१ रुपये प्रतिक्विंटल कमाल भाव मिळाला. लाल कांद्याच्या आवकेत वाढ झाल्याने दरावर दबाव निर्माण झाला असून, दुसरीकडे उन्हाळ कांद्याची आवक मंदावल्याचे बाजार समितीत दिसून आले.
राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या कांदा उत्पादक राज्यांमधून नवीन खरीप कांद्याची आवक वाढत असल्याने घाऊक बाजारातील दर नरमल्याचे केंद्र सरकारचे निरीक्षण आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनीही बाजारात कांद्याच्या दरात नरमाई सुरू झाल्याचे नमूद केले आहे. खरीप कांद्याची आवक वाढल्याने बाजारातील पुरवठा सुधारत असून, आगामी हंगामात उत्पादन आणि उपलब्धता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दिल्लीतील आझादपूर बाजार समितीत कांद्याचे घाऊक दर ३५ ते ४० रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आले असून, महिनाभरापूर्वी हे दर ५० ते ५५ रुपये प्रतिकिलो होते. लासलगाव बाजार समितीतही कांद्याचे दर ४५ ते ४७ रुपये प्रतिकिलोच्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे.
घाऊक बाजारात दर काहीसे नरमले असले, तरी किरकोळ बाजारात कांद्याचे दर ५० ते ५५ रुपये प्रतिकिलोच्या दरम्यान आहेत. देशातील सरासरी किरकोळ दर ५३.८३ रुपये प्रतिकिलो नोंदवला असून, गतवर्षीच्या तुलनेत किरकोळ दरात तब्बल १०१ टक्क्यांची वाढ असल्याचे ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. त्यामुळे घाऊक बाजारातील नरमाईचा लाभ अद्याप ग्राहकांना मिळालेला नाही.
यंदा खरीप कांद्याची वाढती आवक बाजारामध्ये दरात तात्पुरती नरमाई निर्माण करत असली, तरी आगामी रब्बी कांद्याची लागवड, हवामान, उत्पादन, निर्यात आणि देशांतर्गत मागणी या घटकांवर पुढील दरांची दिशा ठरणार आहे. केंद्र सरकारच्या दर नरमाईच्या निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष बाजारातील दर शेतकऱ्यांना कितपत दिलासा देतात, याकडे लासलगावसह देशातील कांदा उत्पादकांचे लक्ष लागले आहे.
लाल कांदा
कमाल : ४,७८१
किमान : १,३५२
सरासरी : ४,२५०
उन्हाळ कांदा
कमाल : ४,९८०
किमान : १,०००
सरासरी : ४,०००