

Nashik onion auction halted
लासलगाव : राज्यासह विविध भागांमध्ये निर्माण झालेल्या इंधन टंचाईचा फटका आता कांदा व धान्य व्यापाराला बसू लागला आहे. मालवाहतुकीसाठी ट्रक उपलब्ध होत नसल्याने व्यापाऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला येथील व्यापारी असोसिएशनने सभापती व सचिवांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
व्यापारी असोसिएशनच्या निवेदनानुसार, इंधन टंचाईमुळे ट्रान्सपोर्ट एजंटकडून मालवाहतूक ट्रकांचा पुरवठा अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे दैनंदिन लिलावात खरेदी केलेला कांदा व धान्य परराज्यांसह विविध बाजारपेठांमध्ये वेळेत पाठविणे कठीण बनले आहे. परिणामी खरेदी केलेला शेतीमाल बाजार समितीतच अडकून पडत असून व्यापारी वर्गावर आर्थिक व व्यवस्थापकीय ताण वाढत आहे.
वाहतुकीतील अडचणींमुळे नवीन शेतीमाल खरेदी करणेही व्यापाऱ्यांसाठी कठीण बनले असून आर्थिक व्यवहारांवर त्याचा थेट परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बाजार समितीमार्फत शासन स्तरावर पाठपुरावा करून परिस्थिती सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, समस्येचे तातडीने निराकरण न झाल्यास सोमवार (दि. २५) पासून व्यापारी वर्ग दैनंदिन शेतमाल लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचा इशाराही असोसिएशनने दिला आहे. त्यामुळे लासलगाव बाजार समितीतील कांदा व्यवहारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.