

लासलगाव : सध्या उन्हाळी कांद्याचा हंगाम सुरू असतानाच लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर गडगडले आहेत. सरासरी दर थेट केवळ एक हजार रुपये प्रतिक्विंटलवर आल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. परिणामी, शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. नाफेड आणि एनसीसीएफकडून कांदा कधी खरेदी होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
यंदा बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे कांदा निर्यातीत घट झाली आहे. त्यातच, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बांगलादेशमध्ये 30 टक्क्यांनी अधिक उत्पादन झाले असून, जूनपर्यंत पुरेल इतका कांदा त्या देशाकडे आहे. या परिस्थितीमुळे कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात ठप्प झाली असून, स्थानिक बाजारपेठांमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळेच कांद्याचे दर घसरत असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे.
गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या उन्हाळ कांद्याला पाणी लागून नुकसान होत आहे. एकीकडे कांद्याला भाव नाही, तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा फटका, अशा दुहेरी संकटातून शेतकरी सध्या जात आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला किमान 500, कमाल 1,555, तर सरासरी 1,000 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
कांदा निर्यातीसाठी बांगलादेश ही एक मोठी बाजारपेठ आहे. मात्र, सध्या तेथील राजकीय अस्थिरतेमुळे निर्यातीत 80 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. याव्यतिरिक्त, तेथे यंदा कांद्याचे बंपर उत्पादन झाले आहे. त्यामुळे भारतातून निर्यात होण्याची शक्यता अत्यल्प आहे.
केंद्र सरकारच्या नाफेड आणि एनसीसीएफ या यंत्रणांनी अद्याप कांद्याची खरेदी सुरू केलेली नाही. त्यामुळे बाजारात मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध असून, त्याचा परिणाम भावावर झाला आहे. परिणामी, सरकारने कांदा खरेदी कधी सुरू करणार, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.