

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
राज्याचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील आणि कांद्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ अशी ओळख असलेल्या लासलगावच्या विकासाला आता स्वतंत्र नागरी प्रशासनाचे बळ मिळावे, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, कांदा व द्राक्ष व्यापारी मोठी उलाढाल आणि नागरी सुविधांनावरील वाढता ताण लक्षात घेता, मंत्री भुजबळ यांनी या प्रश्नात लक्ष घालून लासलगावला स्वतंत्र नगरपंचायतीचा दर्जा मिळवून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
यासाठी २६ जानेवारी २०२६ च्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याचा सर्वानुमते ठराव मंजूर झाला आहे. लासलगाव हे केवळ निफाड तालुक्यातील गाव नसून कांद्याच्या व्यापारामुळे देश-विदेशात ओळख निर्माण केलेले महत्त्वाचे आर्थिक केंद्र आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत होणारी कांद्याची मोठी आवक, द्राक्ष व्यापार, व्यापारी उलाढाल आणि परिसरातील गावांशी असलेला दैनंदिन संपर्क यामुळे लासलगावचा विस्तार सतत वाढत आहे.
गावांची लोकसंख्या २५ हजारांहून अधिक असल्याचा अंदाज असून, वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत उपलब्ध सुविधांवर ताण पडत आहे. पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, अंतर्गत रस्ते, स्वच्छता, पथदिवे, घनकचरा व्यवस्थापन आणि वाहतूक नियोजन अशा मूलभूत सुविधांसाठी नियोजनबद्ध यंत्रणेची गरज निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीच्या मर्यादित निधी आणि मनुष्यबळामुळे वाढत्या नागरी गरजा पूर्ण करताना अडचणी येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
लासलगाव हे मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील महत्त्वाचे शहर असल्याने त्यांनी या मागणीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यास नागरी विकासाचे स्वतंत्र नियोजन, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि वाढत्या लोकसंख्येला आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मदत होऊ शकते.
त्यामुळे लोकसंख्या, बिगरशेती क्षेत्र, व्यापारी महत्त्व आणि लागू वैधानिक निकषांचा विचार करून शासनाने लासलगाव नगरपंचायत स्थापनेच्या प्रस्तावाची तातडीने तपासणी करावी आणि आवश्यक मंजुरीसाठी कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.