नाशिक : अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या दीपोत्सवात शुक्रवारी (दि. १) लक्ष्मीपूजन साजरे करण्यात येणार आहे. लक्ष्मीपूजनानिमित्ताने बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले असून, पूजा साहित्य खरेदीसाठी नाशिककरांची झुंबड उडाली. दरम्यान, शनिवारी (दि. २) दिवाळी पाडवा व रविवारी (दि. ३) भाऊबीज साजरी होणार असल्याने तीन दिवस सर्वांसाठी आनंदमय पर्वणी असणार आहे.
पहिला दिवा लागता द्वारी आनंदाचे क्षण येई घरी. सणांचा राजा अर्थात दीपोत्सवाला प्रारंभ झाला आहे. दीपावलीमध्ये आतुरता लागून असलेले लक्ष्मीपूजन शुक्रवारी (दि. १) सर्वत्र साजरे करण्यात येणार आहे. यंदा शुक्रवारी (दि. १) अमावस्या प्रदोष काळात अल्पवेळ आहे. परिणामी, लक्ष्मीपूजन साजरे करण्यावरून विविध तर्कवितर्क होते. पण धर्मशास्त अभ्यासकांनी याबद्दल अधिकची स्पष्टता करताना शुक्रवारीच लक्ष्मीपूजन साजरे करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने बाजारपेठेत खरेदीची लगबग पाहायला मिळाली.
लक्ष्मीपूजनासाठी झेंडूची फुले, लाह्या-बत्तासे, केरसुणी (लक्ष्मी), अन्य पूजा साहित्य तसेच रांगाेळी व विविधरंगी रांगोळीचे रंग खरेदीचा महिलावर्गाने आनंद लुटला. घराच्या प्रवेशद्वारासाठी लक्ष्मीचे पावले व निरनिराळे डिझाईनच्या स्ट्रीकर्सलाही मागणी असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, लक्ष्मीपूजनानंतर पुढील दोन दिवस सलग बलिप्रतिपदा अर्थात पाडवा तसेच भाऊबीज साजरी केली जाणार आहे. अवघे वातावरण सुखमय झाले आहे.
चोपडी (वही) खरेदी
लक्ष्मीपूजनाला चोपडी (वही) पूजनाचे विशेष असे महत्त्व आहे. या दिवशी व्यावसायिकांमध्ये हिशोब तपासणी चोपडीचे पूजन करतात. त्यामुळे नवीन वही, हिशोबाची रोजनिशी व पेन खरेदीसाठी नागरिकांनी स्टेशनरीच्या दुकानात गर्दी झाली. यावेळी २० रुपयांपासून ते साधारणत: ५०० रुपयांपर्यंत (व्यावसायिक रोजनिशी) बाजारात उपलब्ध होती.
सायंकाळी ६ ते ८.३० : लाभ
रात्री १२.३० ते १.३३ : शुभ
सकाळी ८.२० ते सकाळी ९.५० : शुभ
दुपारी २.२० ते दुपारी ३.५० : लाभ
दुपारी ३.५१ ते सायंकाळी ५.२९ अमृत
सायंकाळी ६.२० ते ७.५० : लाभ