

नाशिक : महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर प्रतीक्षा लागून असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा सहावा हप्ता महिलांच्या खात्यात वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात ही प्रक्रिया सुरू झाली असून, एक हजार 500 रुपयांप्रमाणेच हा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे. जिल्ह्यातील पंधरा लाख 3 हजार 880 महिलांच्या खात्यावर 225 कोटी 58 लाख 20 हजार रुपये जमा झाले आहेत.
महिलांच्या आर्थिक अडचणी सोडवता याव्यात, त्यांच्या आरोग्याबाबत खबरदारी घेता यावी, याशिवाय इतरही छोट्या-मोठ्या अडचणी सोडवताना मदतीचा हात मिळावा म्हणून महायुती सरकारने महिलांना एक हजार 500 रुपयांचा दरमहा निधी देण्याची घोषणा केली होती. जुलैपासून हा हप्ता देण्यास प्रारंभ झाला. जिल्ह्यात या योजनेमध्ये आतापर्यंत पंधरा लाख 74 हजार 409 अर्ज प्राप्त झाले होते. यातील 9 हजार 268 अर्ज विविध कारणांनी नाकारण्यात आले आहे. यानंतर 15 लाख 3 हजार 880 लाभार्थी महिला प्रत्यक्ष लाभार्थी ठरल्या आहेत.
महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पाच हप्ते जमा केले. यानंतर आचारसंहितेमुळे प्रकरणे थांबली होती. अनेक प्रकरणांमध्ये उत्पन्नाच्या दाखल्याचा अडथळा निर्माण झाला होता. या अर्जाची छाननी करून त्रुटीदेखील दुरुस्त केली. या सर्व खात्यांमध्ये आता लाडक्या बहिणींचा निधी वर्ग केला जात आहे. निवडणुकीमध्ये महायुती सरकारने महिलांना दोन हजार १०० रुपये दरमहा देण्याची घोषणा केली होती. यानुसार सरकार स्थापन झाल्यावर हा निधी मिळेल, अशी अपेक्षा महिलांना होती. प्रत्यक्षात एक हजार 500 रुपयांपप्रमाणेच हप्ता खात्यामध्ये जमा झाले आहे. वाढीव मदतीसाठी तसा शासन आदेश निघालेला नाही. यासंदर्भात तरतूद झाल्याचे सांगितले जात असले, तरी अद्यापही आदेश न निघाल्याने एक हजार 500 रुपये खात्यामध्ये वर्ग झाले आहेत.
जिल्ह्यातील पंधरा लाख ३ हजार ८८० महिलांच्या खात्यावर डिसेंबर २०२४ या महिन्याचा एक हजार ५०० प्रमाणे सहावा हप्ता जमा केला आहे. दोन हजार १०० प्रमाणे हप्ता जमा करण्याबाबत शासनाकडून अद्याप आदेश प्राप्त झालेले नाही.
प्रताप पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद