नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अखेरच्या क्षणी अध्यक्षपदासाठी चुरशीच्या झालेल्या लढतीत कोंडाजी आव्हाड यांचा विजय झाला असून, त्यांनी तानाजी जायभावे आणि पंढरीनाथ थोरे यांचा पराभव केला. या निवडणुकीत उपाध्यक्षपदासाठी झालेल्या लढतीत उदय घुगे यांनी पी. आर. गिते आणि कमलेश बोडके यांचा पराभव केला.
संस्थेच्या निवडणुकीत यंदा प्रथमच चार पॅनल रिंगणात होते. त्यापैकी हेमंत धात्रक आणि तानाजी जायभावे यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलने २९ पैकी २३ जागांवर विजय संपादन करत संचालक मंडळात वर्चस्व ठेवले, तर कोंडाजी आव्हाड व उदय घुगे यांच्या परिवर्तन पॅनलने सहा जागांवर विजय मिळविला. यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष या प्रमुख पदांवर ते निवडले गेले.
संस्थेच्या २९ जागांसाठी रविवारी (दि. २८) पंचवटीतील भावबंधन मंगल कार्यालयात मतमोजणी झाली. तब्बल साडेचार तास उशिरा सुरू झालेल्या मोजणीत सुरुवातीला मतपत्रिकांचे गठ्ठे करण्यात आले. प्रत्यक्ष मतमोजणीला दुपारी 3.30 वाजता सुरुवात झाली. सर्वाधिक ६ जागांसाठी असलेल्या विश्वस्त व नाशिक गटातील ४ जागांसाठी मतमोजणी झाली. पहिला निकाल सायंकाळी ७.१५ वाजता जाहीर झाला. नाशिक शहर तालुका गटातून प्रगती पॅनलचे ३, तर परिवर्तन पॅनलचा १ उमेदवार विजयी झाला. विश्वस्त पदासाठी असलेल्या 6 जागांपैकी 5 जागांवर प्रगती पॅनलचे, तर 1 जागेवर परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजय झाले. निफाड तालुका गटातून 3 पैकी 2 जागांवर प्रगतीचे, तर 1 जागेवर परिवर्तन पॅनेलचे उमेदवार विजयी झाले. सिन्नर तालुका गटातून तिन्ही जागांवर प्रगती पॅनलच्या उमेदवारांनी बाजी मारली. या पाठोपाठ झालेल्या महिला राखीव गटातून दोन्ही जागांवर प्रगती पॅनल विजय मिळवला. दिंडोरी तालुका गटातूनही प्रगती पॅनलचे २. तर परिवर्तन पॅनलचा १ उमेदवार विजयी झाले.
अध्यक्ष (परिवर्तन) : कोंडाजी मामा आव्हाड (२२३२)
उपाध्यक्ष (परिवर्तन) : उदय घुगे (२४४६)
सरचिटणीस (प्रगती) : हेमंत धात्रक (२५३२)
सहचिटणीस (प्रगती) : दिगंबर गिते (२९१२)
विश्वस्त : (६ जागा)
प्रगती : दामोदर मानकर (२५५३), अशोक नागरे (२१०६), बबनराव सानप (२०९९), नामदेव काकड (२०६८), नारायण काकड (२०४९)
परिवर्तन : लक्ष्मणराव जायभावे (२२३५)
नाशिक तालुका शहर (४ जागा)
प्रगती : प्रकाश घुगे (२५४१), प्रल्हाद काकड (२४३९), बाळासाहेब धात्रक (२३२५)
परिवर्तन : गोकुळ काकड (२२२२)
सिन्नर (३ जागा)
प्रगती : जयंत आव्हाड (२४८१), समाधान गायकवाड (२४७३), हेमंत नाईक (२३३९)
निफाड (३ जागा)
प्रगती : पुंजाहरी काळे (२५०४), बंडू दराडे (२३५३)
परिवर्तन : उद्धव कुटे (२३३६)
महिला राखीव (२ जागा)
प्रगती : रेखा रामप्रसाद कातकाडे (२५५१)
नंदा बंडू भाबड (२४१६)
दिंडोरी (३ जागा)
प्रगती : शरद बोडके (२५९३), राजेश दरगोडे (२३५०)
परिवर्तन : सुभाष आव्हाड (२३०४)
येवला (२ जागा)
प्रगती : रमेश नामदेव वाघ (२३३७), संपत वाघ (२३२३)
नांदगाव (२ जागा)
प्रगती : त्र्यंबक डोंगरे (२३५३), किशोर लहाने (२३४३)
उपाध्यक्ष पदासाठी निवडून गेलेले उदय घुगे यांनी गेल्या चार टर्ममध्ये संस्थेच्या संचालक मंडळात काम केलेले प्रगती पॅनलचे पी. आर. गिते यांचा पराभव केला. पहिल्यांदाच निवडणूक लढवत त्यांनी थेट उपाध्यक्ष पदाची उमेदवारी करत निवडून आल्याने त्यांचा विजय हा चर्चेचा विषय ठरला होता.
प्रगती पॅनलच्या वतीने सर्व उमेदवार कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकद लावत प्रचार मोहीम राबविली होती. मतमोजणीमध्येही प्रगती पॅनलचे वर्चस्व दिसून येत होते. मात्र, अध्यक्षपदासाठी तानाजी जायभावे यांना १४८ मते कमी पडल्याने परिवर्तनच्या कोंडाजी आव्हाड यांचा विजय झाला. त्यामुळे प्रगतीचा गड आला मात्र अध्यक्षपदाचा सिंह गेला अशी भावना उपस्थितांमध्ये झाली होती.