

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठच्या कुसुमाग्रज अध्यासन केंद्रातर्फे देण्यात येणाऱ्या कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्काराने प्रसिद्ध बंगाली कवी अमिताभ गुप्ता आणि आसामी कवी नीलिमकुमार यांना सन्मानित करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे दरवर्षी भारतीय पातळीवरील महत्वाच्या अ-मराठी कवीला 'कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार' दिला जातो. सन २०२२ चा पुरस्कार अमिताभ गुप्ता यांना तर सन २०२३ चा पुरस्कार नीलिमकुमार यांना विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते बुधवारी (दि. १२) प्रदान करण्यात आला. महावस्त्र, श्रीफळ एक लाख रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्कारचे स्वरुप होते. सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून कवी व अनुवादक आणि पुरस्कार निवड समिती अध्यक्ष डॉ. चंद्रकांत पाटील उपस्थित होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिलीप भरड, अध्यासनाचे प्रमुख डॉ. दिलीप धोंडगे यांची उपस्थिती होती. नीलिमकुमार यांनी 'बारीश' आणि 'भला आदमी' या कविता सादर केल्या.
प्रारंभी डॉ. धोंगडे यांनी प्रस्तावना आणि स्वागत केले. दत्ता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी दिलीप बसू, नंदिता बसू, विद्यापीठाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील मोठे नाव असून त्यांच्या नावाचा पुरस्कार हा आनंददायी आहे. नव्या शतकात कविता वाचणाऱ्यांना आनंद प्रदान करणारी असावी. कवितेतून विश्व शांतीचे उद्दीष्टही साध्य व्हावे. कविता ही हृदयाची, मनाची भाषा आहे.
कवी अमिताभ गुप्ता
कुसुमाग्रज यांच्या नावाचा पुरस्कार सौभाग्य आणि अतीव आनंदाचा क्षण आहे. पुरस्कारने भाषेविषयी पूर्वी असलेले उत्तरदायित्व अधिकच वाढले आहे. कविता माझा श्वास आणि 'आयुष्य' झाली आहे. कविता लिहू शकलो नाही तर जीवनच उरणार नाही.
आसामी कवी नीलिमकुमार