

नाशिक : नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रयागराजच्या धर्तीवर स्वतंत्र सिंहस्थ प्राधिकरण स्थापनेचा अध्यादेश राज्यपालांच्या मंजुरीने जारी करण्यात आला आहे.
प्राधिकरणाची धूरा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे या प्राधिकरणाचे उपाध्यक्षपद तर महापालिका आयुक्तांसह १९ विविध विभागांचे प्रमुख प्राधिकरणाचे पदसिध्द सदस्य असणार आहे. दरम्यान, प्राधिकरणात साधु-महंतांना स्थान देण्यात आलेले नाही.
सिंहस्थ कुंभमेळ्याची प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. नाशिक महापालिकेने सिंहस्थ कामांसाठी १५ हजार कोटींचा तर अन्य विभागांनी नऊ हजार कोटी अशा एकूण २४ हजार कोटींचा सिंहस्थ आराखडा तयार करण्यात आला असला तरी अद्याप या आराखड्याला शासनाची मंजुरी मिळू न शकल्याने सिंहस्थ कामे खोळंबली आहेत. परिणामी, साधु-महंतांकडून नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंहस्थासाठी प्रयागराजच्या धर्तीवर विशेष प्राधिकरण स्थापण्याची घोषणा केली होती. ६ मे रोजी अहिल्यानगर येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये प्राधिकरण करण्याच्या कायद्याला मंजूरी दिली होती. त्यानंतर महिनाभराने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या मंजूरीने प्राधिकरणाचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अधिकृतरित्या आता नाशिक-त्र्यंबकेश्वरसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन होणार आहे.
विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे प्राधिकरणाची सूत्रे देण्यात आली आहेत. सर्वाधिकार त्यांच्याकडे असणार आहेत. त्यात कुंभमेळा आराखडा तयार करणे, प्रस्तावित बांधकामांना प्रशासकीय मान्यता देणे निविदा प्रक्रिया राबवणे, कंत्राटदार नियुक्त करणे, कंत्राटांच्या दायित्वांचे संनियंत्रण करणे, कुंभमेळयासाठी बांधलेल्या मालमत्तांच्या पुढील वापराबाबत निर्णय घेणे, प्राधिकरणाचा अहवाल दर महिन्याला मंत्री समितीसमोर सादर करणे अशा प्रमुख जबाबदाऱ्या असणार आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन सुव्यवस्थित व्हावे, सर्व यंत्रणांचा समन्वय व्हावा, कुंभमेळ्याची कामे गतीने व्हावे, यासाठी प्राधिकरणात विविध विभागाचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार विभागीय आयुक्त (अध्यक्ष), जिल्हाधिकारी, विशेष पोलिस महानिरीक्षक (उपाध्यक्ष), अहिल्यानगर जिल्हाधिकारी, नाशिक महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण आयुक्त, (पदसिध्द सदस्य) नाशिक शहर पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण, नाशिक महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी, त्र्यंबकेश्वर नगरपरिषद, नियोजन उपायुक्त, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ विभागीय नियंत्रक, आरोग्य उपसंचालक, अधीक्षक अभियंता जलसंपदा गोदावरी नदी व जलव्यवस्थापन, बांधकाम विभाग मुख्य अभियंता, मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अधीक्षक अभियंता महावितरण, प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, सहसंचालक लेखा व कोषागरे, सहसंचालक नगररचना, रेल्वे मंडळाचा सदस्य आणि कुंभमेळा आयुक्त अशा २२ जणांचा समावेश आहे.
कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली जाणार आहे. यातून प्राधिकरणाचा खर्च भागवला जाणार असून या प्राधिकरणाला देणग्या, मृत्यूपत्र स्विकारण्याचा अधिकार देण्यात आला आहे. केंद्र, राज्यसरकारकडून मिळणारा निधीही प्राधिकरणाच्या निधीत जमा होणार आहे. अध्यक्षांच्या मदतीला कुंभमेळा आयुक्त हे पद निर्माण करण्यात आले आहे. प्राधिकरण स्थापन झाल्यानंतर सिंहस्थाचे नियोजन हे आता संपूर्ण १२ वर्ष चालत राहणार आहे.
सिंहस्थ प्राधिकरणात आखाड्यांच्या प्रतिनिधींचा समावेश व्हावा, अशी मागणी आखाडा परिषपदेतर्फे करण्यात आली होती. परंतु, प्राधिकरणात केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. एकाही साधु-महंताला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे साधु-महंतांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. आखाडा परिषदेच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हरिद्वार आणि प्रयागराजच्या धर्तीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थाकरीता प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली ही आनंदाची बाब आहे. साधु-महंतांना स्थान नसले तरी गत २० वर्षांची मागणी मान्य करण्यात आली, ही आनंदाची बाब आहे. आगामी काळात प्राधिकरण अध्यक्षांचा पाठपुरावा करून आखाड्यांच्या मागण्या मान्य करवून घेवू. लवकरच आखाडा परिषदेचे प्रतिनिधी अध्यक्षांची भेट घेतील.
महंत भक्तिचरणदास महाराज, वैष्णव आखाडा.