

नाशिक : नाशिक - त्र्यंबकेश्वरनंतर उज्जैन येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीला आतापासूनच वेग आला असताना, नाशिकमधील सिंहस्थाची कामे कागदावरच रेंगाळल्याची नाराजी व्यक्त करत, साधू - महंतांनी पहिल्या पर्वणीपूर्वी किमान सहा महिने आधी आखाड्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असा स्पष्ट इशारा प्रशासनाला दिला आहे. इतकेच नव्हे, तर प्रयागराजच्या धर्तीवर तयार केल्या जाणाऱ्या स्वतंत्र प्राधिकरणात साधू - महंतांचाही सहभाग असावा, अशीदेखील मागणी केली आहे.
सिंहस्थ कुंभमेळा नियोजनात विविध आखाड्यांच्या साधू-महंतांचा समावेश करण्याच्या उद्देशाने महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात सोमवारी (दि. २४) बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री उपस्थित होते. याप्रसंगी साधू-महंतांनी प्रशासनासमोर विविध मागण्या मांडल्या. त्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करत उज्जैनच्या कुंभमेळ्याची तयारी पूर्ण झालेली असताना नाशिकमध्ये सिंहस्थ तयारीला विलंब होत असल्याचे नमूद केले.
याप्रसंगी पंचमुखी हनुमान मंदिराचे भक्तिचरणदास महाराज, सीतागुंफा येथील योगेंद्र गोसावी, कपालेश्वर मंदिर ट्रस्टचे ॲड. अक्षय कलंत्री, महंत सुधीरदास महाराज, महंत रघुनाथ, महामंडलेश्वर डॉ. रामकृष्णदास लहवितकर, माधवदास राठी, शंकरदास महाराज, माधवदास महाराज, राघवदास त्यागी, खाकी आखाड्याचे महंत भगवानदास पूरणदास, रामसृष्टी तपोवन येथील चंदनदास गुरुजानकी, त्र्यंबक येथील सीताराम आखाड्याचे श्री महंत नारायण दास, बालाजी मंदिर ट्रस्टचे पवनदास लक्ष्मणदास, इस्कॉन मंदिराचे नरसिंह कृपा, श्रीराम कपिलदास, श्रीराम अर्पण कोटीचे महंत वैजनाथ, सनातन वैदिक धर्मसभेचे अध्यक्ष भालचंद्र शौचे, गोरेराम मंदिराचे महंत राजाराम दास, भोलादास मठाचे महंत श्रीराम किशोरदास, ब्रह्मकुमारी वासंती दीदी, श्री कालिका मंदिर ट्रस्टचे केशव पाटील, पुरोहित संघाच्या वतीने प्रतीक शुक्ल आदी उपस्थित होते.
साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जमीन अधिग्रहित करावी. साधुग्रामसाठी ५०० - ७०० एकर जागा निश्चित करावी. साधुग्रामला चार प्रवेशद्वार असावेत. भूसंपादन करणाऱ्या शेतकऱ्यांना संपूर्ण मोबदला मिळावा. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र कार्यालय स्थापन करावे. प्राधिकरणात १३ आखाड्यांच्या महंतांचा समावेश करावा. शासनस्तरीय समित्यांमध्येही साधू-महंतांचा समावेश असावा. नाशिक - त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात दुजाभाव होऊ नये. साधू - महंतांना कुंभमेळा नियोजनासंदर्भात संपूर्ण माहिती मिळावी. मंदिरांमध्ये भक्तनिवासाची कायमस्वरूपी किंवा तात्पुरती व्यवस्था करावी. गोदावरी नदीत सांडपाणी व नाले मिसळणे त्वरित थांबवावे या मागण्यांवर प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा, असे साधू-महंतांनी आवाहन केले.
गत सिंहस्थ कुंभमेळ्यात संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेला नसल्याची बाब नमूद करत, साधुग्रामसाठी जागेचे कायमस्वरूपी संपादन करताना जागामालक शेतकऱ्यांना पुर्ण मोबदला त्वरित अदा करावा. शेतकऱ्यांना नाराज करू नका. त्यांना नाराज करून आम्हाला कुंभमेळा करण्यात आनंद नाही, अशा शब्दांत साधू - महंतांचे प्रवक्ते भक्तिचरण दास यांनी भूमिका मांडली.
स्थानिक आखाड्यांना पंचवटीच्या मेरी तसेच गांधीनगर, नेहरूनगर या सरकारी वसाहतींमध्ये सामावून घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पर्वणीकाळात गर्दी नियंत्रणासाठी रामकुंड व्यतिरिक्त अन्य स्थळांचा विचार व्हावा, अहिल्याबाई होळकर पुलाच्या मागील बाजूस चांदशीपर्यंत घाटांची निर्मिती करून अमृतस्नानानंतर त्याठिकाणी स्नानाची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली.