Kumbh Mela Nashik: 'राम काल पथ'साठी गुजरातचा ठेकेदार

खासदार राऊत यांच्या आरोपांनंतर दोन दिवसांतच ठेकेदार निश्चित झाल्याने आश्चर्य
Nashik Ram Kal Path
साबरमतीच्या धर्तीवर गोदाघाट परिसरात 'राम काल पथ' प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. file photo
Published on
Updated on

नाशिक : प्रयागराजनंतर नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील कामेदेखील गुजरातच्या ठेकेदारांनाच दिली जातील, या शिवसेना उबाठा पक्षाचे नेते खा. संजय राऊत यांच्या वक्तव्याला दोन दिवस उलटत नाही तोच, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर मंजूर करण्यात आलेल्या १४६ कोटींच्या 'राम काल पथ' प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाच्या ठेक्यासाठी गुजरातची कंपनी पात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. आता हा योगायोग म्हणावा की सत्य परिस्थिती यावर खल सुरू झाला आहे.

नाशिकमध्ये २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या कुंभमेळ्याची जोरदार प्रशासकीय तयारी सुरू आहे. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दौऱ्यावर येत साधू-महंतांच्या आखडाप्रमुखांच्या उपस्थितीत सिंहस्थ पर्वस्नानांच्या तारखांची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाचे नेते खा. राऊत यांनी टीका करत सिंहस्थ कुंभमेळ्याची हजारो कोटींची कामे गुजरातच्या ठेकेदारांना देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर नाशिकमध्ये सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर उभारल्या जात असलेल्या केंद्रीय पर्यटन विभागाच्या राम काल पथ प्रकल्पासाठी गुजरातचा ठेकेदार पात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे.

राम काल पथ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात काळाराम मंदिरासमोरील परिसर, सीतागुंफा ते रामकुंडापर्यंतचा परिसर विकसित केला जाणार आहे. यासाठी २२ कोटींच्या कामासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली होती. अहमदाबाद येथील मे. एच. सी. पी. डिझाईन प्लॅनिंग ॲण्ड मॅनेजमेंट कंपनी या निविदेसाठी पात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे.

Nashik Ram Kal Path
Simhastha Kumbh Mela Nashik: 'राम काल पथ' बाधित सहा वाडे उतरविणार

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेल्या १०० दिवस गतिमान कार्यक्रम या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील २२ कोटींची कामे सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला केवळ एकाच निविदाधारकाचा प्रतिसाद मिळाला. यामुळे प्रशासनाने आठ दिवस मुदतीची फेरनिविदा प्रसिद्ध केली असता त्यात तीन निविदाधारकांनी सहभाग घेतला. यासंदर्भात आर्थिक देकार उघडण्यात आले असता त्यात दोन एजन्सी पात्र ठरल्या होत्या. मात्र, सवानी नामक एजन्सीचे दर कमी असल्यामुळे ही एजन्सी पात्र ठरली असून, कार्यारंभ आदेश दिल्यानंतर लगेचच कामांना सुरुवात होणार आहे.

राम काल पथ प्रकल्पात ही कामे होणार

राम काल पथ प्रकल्पांतर्गत सीतागुंफा ते श्री काळाराम मंदिर सुशोभीकरण, श्री काळाराम मंदिर ते रामकुंड परिसराचे सौंदर्यीकरण, अहिल्यादेवी होळकर पूल परिसर, गांधी तलाव, रामकुंड भागातील सौंदर्यीकरण, गांधी तलाव व रामकुंड परिसरात प्रभू श्रीरामाची धनुर्धारी भव्य प्रतिकृती, टाळकुटेश्वर पुलापर्यंत पुतळे, शिल्प, स्तंभ, विद्युत रोषणाई आदी कामे केली जाणार आहेत.

फेरनिविदेमध्ये तीन निविदाधारकांनी सहभाग घेतला होता. त्यात आर्थिक देकारमध्ये सवानी नामक एजन्सी क्वॉलिफाय झाली असून, निविदेसंदर्भातील इतर बाबींची पूर्तता करून कार्यारंभ आदेश देण्यात येतील.

संजय अग्रवाल, शहर अभियंता, मनपा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news