

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : येथील श्री शंभु पंचायती अटल आखाड्यातील प्रमुख साधु-महंतांची सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२७ च्या पूर्वतयारीसंदर्भात महत्वपूर्ण बैठक शनिवारी (दि. १४) पार पडली. त्यात कुंभमेळ्याच्या नियोजनावर तसेच साधू-संत आणि भाविकांसाठी सुविधा उभारणीसह पर्यावरण संवर्धनावर चर्चा करण्यात आली. शिवाय, नवे पदाधिकारीही घोषित करण्यात आले.
अटल आखाड्याची इष्टदेवता गणेश भगवान असून, येत्या २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर अटल आखाड्यात उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवानंतर कुंभमेळ्याच्या प्रत्यक्ष तयारीला सुरुवात होणार असून, साधू-महंतांसाठी निवास व आवश्यक सुविधा उभारण्यात येणार आहेत.
चर्चेअंती अटल आखाड्याच्या ठाणापती पदावर ब्रह्मलीन उदयगिरी महाराज यांचे शिष्य दिपेंद्रगिरी महाराज यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच कुंभमेळ्याचे कामकाज पाहण्यासाठी श्री महंत मंगतपुरी आणि सचिव बटुकगिरी यांची निवड झाली. या निर्णयांची घोषणा अटल आखाड्याचे सचिव श्री महंत सत्यमगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बैठकीला सचिव सनातन भारती, सचिव पवनगिरी, सचिव सुंदरगिरी, श्री महंत प्रमोदगिरी, श्री महंत गोविंदगिरी, श्री महंत सतीशगिरी, महंत पद्मनाभगिरी आणि श्री महंत आनंदगिरी महाराज यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
श्री शंभु पंचायती अटल आखाडा हे संत निवृत्तिनाथ मंदिराच्या पाठीमागे, गंगाद्वार पायथ्याला वसलेले असून, येथे म्हाळसा देवी मंदिरही आहे. ब्रह्मलीन महंत उदय गिरी महाराज यांच्या निर्वाणानंतर नवे नेतृत्व मिळाल्याने आता अखाड्याच्या कुंभमेळा तयारीला गती मिळणार असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले.