

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : आगामी सिंहस्थ कुंभमेळा नियोजनात प्रत्येक आखाड्यास सेवा सुविधांच्या निर्मीतीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले आहे. नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध कामांच्या भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची अखिल भारतीय आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती यांनी भेट घेत त्यांच्याकडे आर्थिक तरतूद करण्याची मागणी केली.
यावेळी आखाड्यांच्या समस्या महंत शंकरानंद महाराज आणि उपस्थित साधूंनी सांगितल्या. याबाबत निश्चितच सकारात्मक विचार करू, असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रत्येक आखाड्यास विकासकामांसाठी पाच कोटी रुपये निधी देण्याबाबत अनुकूलता दर्शवली. याबाबत महंत शंकरानंद महाराज यांनी आखाड्यांतर्फे आभार व्यक्त केले.
सरकारने कुंभमेळ्याबाबत आखाड्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत हिंदू धर्माच्या प्रति दाखवलेला आदरभाव व सन्मान निश्चितच कौताकास्पद आहे. याबाबत साधूंमध्ये समाधान आहे.
महंत शंकरानंद सरस्वती, कोषाध्यक्ष, आखाडा परिषद
नाशिक येथे झालेल्या भूमिपूजन सोहळयात सर्व साधूंचा शासनाने यथोचित सन्मान केला. साधूंप्रति सरकारने व्यक्त केलेला आदरभाव सर्व साधू-महंतांना सुखावणारा ठरला आहे. महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांनी कुंभमेळा यशस्वी होईल आणि त्र्यंबकेश्वर व नाशिकसह महाराष्ट्र सरकारचा नावलौकिक वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.