नाशिक : शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करतानाच हवामान अनुकूल, शाश्वत आणि किफायतशीर शेतीला प्रोत्साहन देत शेती उत्पन्नात वाढ करून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्याच्या उद्देशाने 'कृषी समृद्ध' या नव्या योजनेची घोषणा कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी (दि. 22) केली. या योजनेंतर्गत पुढील पाच वर्षांमध्ये दरवर्षी पाच हजार कोटी असा एकूण 25 हजार कोटींचा निधी कृषी विभागाला उपलब्ध करून दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसादिनाचे औचित्य साधत कृषिमंत्री कोकाटे यांनी नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधताना, शेतकऱ्यांसाठी 'कृषी समृद्ध' ही योजना जाहीर केली. यावेळी त्यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली. राज्यातील शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. राज्याच्या कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्याकरिता अर्थसाहाय्य केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कृषी समृद्ध योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यास, त्यानुसार 2025- 26 पासून पुढील 5 वर्षांमध्ये दरवर्षी 5 हजार कोटी अशी एकूण 25 हजार कोटींची तरतूद करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, पीक विविधीकरण करणे, मूल्य साखळी बळकट करणे तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, हा कृषी समृद्ध योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने समृद्धी येईल, असा विश्वास कोकाटे यांनी व्यक्त केला.