

मनमाड : नाशिक मर्चंट बँकेच्या मालेगाव शाखेत झालेल्या हवाला प्रकरणाची व्याप्ती 21 राज्यांत असून, या प्रकरणात तब्बल एक हजार कोटींचा व्यवहार झाल्याचा आरोप भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya,Former Member of the Lok Sabha) यांनी केला आहे. सोमवारी (दि. 9) मालेगाव दौऱ्यावर जात असताना सोमय्या यांनी मनमाड येथे पत्रकारांशी संवाद साधला.
माजी खा. सोमय्या म्हणाले की, हवाला प्रकरणात दुसरी टोळीदेखील सक्रिय झाली असून, मला काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. त्यामुळे मी मालेगावला दुसऱ्यांदा भेट देण्यासाठी जात आहे. या प्रकरणात एक हजार कोटींचा व्यवहार झाल्याचे सिद्ध झाले आहे. आता दुसरी टोळी सक्रिय झाली असून, पहिल्या टोळीचा मास्टरमाइंड अहमद भगाड आहे. त्याने आणि सिराज अहमद या दोघांनी 12 तरुणांची फसवणूक केली आहे. हे मालेगाव, सुरत, अहमदाबाद, मुंबई असे 21 राज्यांतून हवाला कारोबार करत होते. हा पैसा वेगवेगळ्या मार्गाने दुबई, हिंदुस्थानात वापरला जात असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. तसेच सिराज अहमद याने नाशिक मर्चंटप्रमाणेच इतरही काही बॅंकांचा वापर केला आहे. त्याने पैशाचा वापर कुठे केला याची माहिती आपल्याकडे आहे.
विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने विरोधकांकडून ईव्हीएम मशीनवर संशय घेत असल्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी विरोधकांची खिल्ली उडवत राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे किंवा राहुल गांधी त्यांना अशा प्रकारचे स्टंट करावे लागतात, असा आरोप केला. महाविकास आघाडीला लोकसभेला चांगल्या जागा मिळाल्या तेव्हा ईव्हीएमची पूजा केली होती, आता विधानसभेला जनतेने त्यांना नाकारल्यामुळे त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे ते पराभवचा खापर ईव्हीएमवर फोडत असल्याचे सोमय्या म्हटले. दरम्यान, मनमाड रेल्वेस्थानकावर भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष शंकर वाघ, सचिन दराडे, नितीन पांडे, पंकज खताळ, जयकुमार फुलवानी संदीप नरवडे, उमाकांत राय, गणेश कासार आदी उपस्थित होते.