Kiren Rijiju | प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन उभारणार

मंत्री किरण रिजिजू : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात लवकरच 'संविधान भवन' उभारले जाणार
Kiren Rijiju, Union Minister of Parliamentary Affairs of India
Kiren Rijiju, (मंत्री किरण रिजिजू) Union Minister of Parliamentary Affairs of Indiapudhari file photo
Published on
Updated on

नाशिक : समाज माध्यमांवर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसून, राजकीय स्वार्थापायी कोणीही संविधान बदलण्याची भाषा करीत आहे. वास्तविक, आपले संविधान अधिक मजबूत व्हावे, यासाठी मोदी सरकार 10 वर्षांपासून २६ नोव्हेंबर हा 'संविधान दिन' साजरा करीत आहे. यंदा या दिवसाचे औचित्य साधून देशव्यापी सोहळ्याचे नियोजन केले जात आहे. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात लवकरच 'संविधान भवन' उभारले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहारमंत्री किरण रिजिजू यांनी केली. (Union Parliamentary Affairs Minister Kiran Rijiju announced that 'Samvidhan Bhavna' will soon be constructed in every district of Maharashtra.)

पाथर्डी शिवारातील त्रिरश्मी बौद्ध लेणी येथे शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऐतिहासिक महाबोधी वृक्ष महामहोत्सव- २०२४ प्रथम वर्धापन दिन व भिक्खू निवास भूमीपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय समाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, आमदार देवयानी फरांदे, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्यासह भिक्खू उपस्थित होते. केंद्रीय मंत्री रिजिजू म्हणाले, देशभरातील अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधित्व करण्याची मोठी जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात बौद्ध समाज मोठ्या संख्येने असून, या समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विविध मागण्या केल्या असून, त्या पूर्णत्वास नेण्याचे काम मी करणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन उभारण्याची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली आहे. याठिकाणी वसतिगृह, ग्रंथालयेदेखील उभारण्याबाबत मदत केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बोधिवृक्ष हे ज्ञानाचे प्रतीक असून, बाबासाहेबांनी शिक्षणाचा जो संदेश दिला आहे, त्याचे समाजाने अनुकरण करणे गरजेचे आहे. बौद्ध धर्म जगाच्या कानाकोपऱ्यात आहे. भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांततेचा संदेश दिला आहे, त्यामुळे जगात उद्भवलेली युद्धजन्य स्थिती बुद्धांनी दिलेल्या संदेशाच्या विरोधात आहे. अशात बुद्धांचा संदेश पुढे घेऊन जाण्याची गरज असल्याचेेही केंद्रीय मंत्री रिजिजू म्हणाले. केंद्रीय राज्यमंंत्री रामदास आठवले यांनी, बाबासाहेबांनी देशाला दिलेले संविधान कोणीही बदलू शकत नाही. संविधान बदलण्याची भाषा आम्ही सहन करणार नाही. बाबासाहेबांचा धम्म पुढे नेणे हेच आमचे मिशन असल्याचे त्यांनी सांगितले. तर मंत्री भुजबळ यांनी, येवल्यातील मुक्तिभूूमी विकासासाठी ३१ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगताना, जगाला युद्धापासून जर कोणी वाचवू शकेल, तर तो बुद्धांचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंंगी ट्रस्टचे भिक्खू सुगत थेरा, भिक्खू संघरत्न, भिक्खू आर्यनाग, भदन्त आर. आनंद, भदन्त कश्यप, प्रकाश लोंढे, रंजन ठाकरे आदी उपस्थित होते.

आठवलेंची भुजबळांसाठी चारोळी

शीघ्रकवी म्हणून प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या भाषणातील चारोळ्या उपस्थितांसाठी नेहमीच कुतुहलाचा विषय असतो. यावेळी त्यांनी भुजबळांसाठी चारोळी म्हटली अन् एकच हशा पिकला. आठवले म्हणाले, 'ज्यांचे नाव ऐकून बऱ्याच लोकांच्या मनात होते मळमळ, त्यांचे नाव आहे छगन भुजबळ'. तसेच 'हमे नाही चाहिए शोर, चलो बुद्ध की ओर' असे म्हणत जगातील युद्धावर गौतम बुद्धांचे विचार हाच पर्याय असल्याचेही त्यांनी म्हटले.

२५ एकर काय मागता, शंभर एकर देतो... मत द्या

नाशिकमध्ये बौद्ध विद्यापीठासाठी शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टने राज्य सरकारकडे २५ एकर जागेची मागणी केली. यावर बोलताना केंद्रीय राज्यमंत्री आठवले म्हणाले, २५ एकर काय मागता, 100 एकर मागा. आम्ही तुम्हाला जमीन उपलब्ध करून देऊ, फक्त आम्हाला मत द्या. असे म्हणताच एकच हशा पिकला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news