

नाशिक : भारत सरकारच्या खेलो इंडिया उपक्रमांतर्गत दीव दमण येथे नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल बीच गेम्स स्पर्धेत नाशिकच्या स्वराज पाटीलने रौप्य पदक पटकावले.
या स्पर्धेत पुरलेला मलखांब, टांगता मलखांब आणि दोरी मलखांब या तिन्ही प्रकारांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्वराजने तिन्ही प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळवला. या अगोदर, ठाणे येथे पार पडलेल्या राज्य निवड चाचणी स्पर्धेत राज्यातील सहा उत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यात आली होती. स्वराज हा यशवंत व्यायाम शाळेतील क्रीडापटू आहे. या यशात प्रशिक्षक यशवंत जाधव, पंकज कडलक, ऋषिकेश ठाकूर, कृष्णा आंबेकर, शुभम अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच, व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील यांचेही मोलाचे योगदान राहिले.