

घोटी / इगतपुरी : मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या मुंबई- गोराशी एक्स्प्रेसला घोटी रेल्वेस्थानक दरम्यान सोमवारी (दि. 2) सकाळी धावत्या रेल्वे इंजीनमध्ये आवाज होऊन आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, रेल्वे प्रशासन व इगतपुरी नगर परिषद अग्निशमन दलाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला.
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, डाउन एक्स्प्रेस 15017 क्रमांक गोरखपूर- काशी एक्स्प्रेस इगतपुरी रेल्वेस्थानकातून सकाळी 9:42 वाजता निघाली होती. मात्र, घोटी रेल्वे स्थानकाजवळ धावत्या ट्रेनमध्ये या ट्रेनचे इंजीन 39050 क्रमांक असलेल्या इंजीन कॅबीनमध्ये बिघाड होऊन हारमोनिक फिल्टरमध्ये फटाक्यासारखा आवाज होऊन आग लागली होती. त्यामुळे मोठा धूर निघाल्याने एक्स्प्रेसचे चालक एन. सी. दयाळ आणि सहायक लोको पायलट अरविंद कुमार यांनी तत्काळ घोटी रेल्वे यार्ड- स्टेशनदरम्यान मेन लाइनवर ट्रेन 9:57 वाजता थांबवून इंजीनचे पेंडलूम सुरक्षेच्या दृष्टीने रिकामे करून इंजीनमधील आग विझविण्याच्या उपकरणाद्वारे आग विझविली.
तसेच घोटी रेल्वेचे एसएनटी विभागाचे कर्मचारी यांनीही आग विझविण्यासाठी मदतकार्य केले. तत्काळ घटना लक्षात आल्याने व आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. इंजीन तपासणीनंतर काशी- एक्स्प्रेसला घोटी रेल्वेस्थानक येथून दुसरे इंजीन लावण्यात आले. नाशिक रोडकडे पुढे नेण्यात आले. या घटनेत लोहमार्ग पोलिस ठाण्याचे अधिकारी बालाजी शेंडगे व स्टेशन प्रबंधक, रेल्वे कर्मचारीसह नगर परिषद, संबंधित अधिकारी यांनी परिश्रम घेतले.