

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा
कादवा सहकारी साखर कारखान्याने २०२६-२७ च्या चालू गळीत हंगामासाठी उसाची पहिली उचल प्रतिटन ३,००० रुपये जाहीर केला आहे. मात्र, राज्यातील इतर कारखान्यांच्या तुलनेत हा दर अत्यंत तोकडा असून, उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल्याने, पहिली उचल किमान ३,५०० रुपये मिळावी, या मागणीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी कारखाना कार्यस्थळावर धडक देत संचालक मंडळाला घेराव घातला.
येत्या आठ दिवसांत या मागणीवर सकारात्मक निर्णय न झाल्यास कारखान्याचे गाळप बंद पाडून तीव्र 'गेट बंद' आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. उपस्थित ऊस उत्पादक सभासदांनी संचालक मंडळापुढे आपल्या व्यथा मांडताना गेल्या दोन वर्षांत रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके, मशागत, मजुरी आणि इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. लागवडीपासून ते तोडणीपर्यंतचा खर्च आटोक्याबाहेर गेल्याने ३,००० रुपयांत शेती करणे अशक्य झाले आहे.
अवकाळी पाऊस, बदलते हवामान आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे उसाच्या एकरी उत्पादनात मोठी घट झाली आहे. अशा कठीण काळात मिळणारी ही रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याचे सांगितले. कोल्हापूर, सांगली आणि राज्यातील इतर अनेक सहकारी व खासगी कारखान्यांनी यंदा ३,३०० ते ३,५०० रुपयांपर्यंत पहिली उचल जाहीर केली आहे. इतर कारखान्यांच्या तुलनेत कादवाचा साखर उतारा चांगला असताना कमी दर का? असा थेट सवाल शेतकऱ्यांनी विचारला.
केंद्र सरकारच्या धोरणामुळे साखर निर्यातीवर निर्बंध आहेत. परिणामी, गोदामांत साखर पडून राहिल्याने खेळत्या भांडवलाची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. तसेच इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध आणि खरेदी दरात वाढ न झाल्याने उपपदार्थातून मिळणाऱ्या उत्पन्नाला फटका बसला आहे.
बाजारातील साखरेच्या तुटवड्यामुळे यंदा गळीत हंगाम एक महिना लवकर सुरू करावा लागला. यामुळे उसाची पुरेशी वाढ न झाल्याने साखर उतारा घटला असून, त्याचा थेट परिणाम ऊस दरावर होत असल्याचा प्रशासनाने स्पष्ट केले. यावेळी म्हेळुस्के, ओझे, करंजवण, लखमापूर, जोरण, वणी, चारोसे, हातनोरे आणि परिसरातील गावांतील ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.
"संचालक मंडळ स्वतःच्या मर्जीने यावर निर्णय घेऊ शकत नाही. अगोदरच साखर उद्योग मोठ्या आर्थिक संकटातून मार्गक्रमण करत आहे. मात्र, येत्या काही दिवसांत जशी कारखान्याची आर्थिक स्थिती मजबूत होईल, त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या मागणीचा नक्कीच सकारात्मक विचार केला जाईल."
— श्रीराम शेटे, चेअरमन, कादवा सहकारी साखर कारखाना