

नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गावरील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. सलग चार दिवस महापालिकेचे पाच अग्निशमन बंब घटनास्थळी कार्यरत होते. त्यापोटी आठ लाखांचे देयक अग्निशमन विभागाने जिंदाल कंपनी व्यवस्थापनाकडे पाठविले असल्याची माहिती अग्निशमन विभागप्रमुख संजय बैरागी यांनी दिली आहे.
इगतपुरीतील मुंढेगावजवळच्या जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीला २१ मे रोजी आग लागली होती. कंपनीत पॉलिप्रिपिलिन चिप्सचा अतिज्वलनशील कच्च्या व पक्क्या मालाचा साठा असल्याने या आगीने अल्पावधीतच रौद्ररूप धारण केले. सलग तीन दिवस ही आग धगधगत होती. चौथ्या दिवशीही धुराचे लोट कायम होते. आगीत कंपनीतील १६ पैकी आठ प्रकल्प खाक झाले, तर ९० टक्के उत्पादन विभाग भक्ष्यस्थानी पडले. आगीचे रौद्ररूप लक्षात घेता प्रशासनाने तीन किमी परिसरासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले होते. कंपनीत लागलेल्या आगीपासून ३० ते ६० मीटरवर अतिज्वलनशील प्रोपेन गॅसची टाकी होती. तिथपर्यंत आग पोहोचू न देण्याचे व 'कूलिंग'द्वारे टाकीचे तापमान नियमित राखण्याचे प्रयत्न केले गेले. या टाकीचा स्फोट झाल्यास २५० मीटरपर्यंत ज्वाळा पसरू शकत होत्या, तसेच स्फोटामुळे एक किलोमीटरपर्यंतच्या परिघातील घरांचे नुकसान होऊ शकत होते. त्यामुळे प्रशासनाने मुंढेगाव, मुंढेगाव वाडी, मुकणे, पाडळी व शेणवड ही पाच गावे रिकामी केली होती. आग विझविण्यासाठी नाशिकसह भिवंडी, शहापूर, पिंप्री-चिंचवड, ठाणे, अहिल्यानगर येथून सुमारे २० अग्निशमन बंब मागविण्यात आले होते. ही आग पाण्याने विझत नसल्याने फोम व अन्य विशेष अग्निशामक बंब बोलावण्यात आले. पुणे येथून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) जवानांची तुकडीही दाखल झाली होती. याशिवाय औद्योगिक सुरक्षा, महसूल, पोलिस, आरोग्य आदी विभागांनीही परिश्रम घेतले. अथक प्रयत्नांनंतर ही आग ओटोक्यात आली.
जिंदाल कंपनीतील आग विझविण्यासाठी महापालिकेचे पाच बंब सलग चार दिवस कार्यरत होते. खासगी ठिकाणी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेकडून प्रतितास, प्रतिबंब एक हजार रुपये शुल्क आकारले जाते. त्यानुसार महापालिकेच्या अग्निशमन विभागाने जिंदाल कंपनी व्यवस्थापनाला आठ लाखांचे देयक सादर केले आहे.