

नाशिक : इंडियन इ्न्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर आयोजित जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. २) जाहीर झाला. त्यात नाशिकमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.
अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांपैकी महत्त्वपूर्ण असलेली जेईई ॲडव्हान्स परीक्षेचे आयोजन दि. १८ मे रोजी करण्यात आले होते. परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. येथील 'रेझोनन्स नाशिक'चे ४० हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश संपादन केले. संस्थेच्या वेदांत भट, ओम गायधनी, फाल्गुन राठोड या तीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर टॉप ७५० मध्ये स्थान मिळवले.
स्पेक्ट्रम गेटवे टू सक्सेस क्लासचे एकूण १६० हून अधिक विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण झाले. ओम चव्हाण, नूपुर देशमुख, प्रणव बागूल, केदार हदनूरकर, ओम नेरकर, चिराग ब्रह्मेचा, आदित्य कट्यार, तनीष पाटील, दर्श गाजरे, अर्थ साहू यांनी परीक्षेत यश मिळवले. विशेष म्हणजे संस्थेचे पहिल्या पाच हजारांत एकूण २५, तर पहिल्या १० हजारांत ४६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 'स्पेक्ट्रम'चे संस्थापक संचालक कपिल जैन यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जेईई अॅडव्हान्स परीक्षेत मुलांमधून रजित गुप्ता, तर मुलींमधून देवदत्ता माझी प्रथम आली आहे. या निकालामध्ये पहिल्या 10 जणांमध्ये मुंबईकर पार्थ वर्तक आणि साहिल देव या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या दोघांसह राज्यातील एकूण तिघे या परीक्षेत ‘यशवंत’ झाले आहेत.
आयआयटी कानपूरने 18 मे रोजी घेतलेल्या जेईई अॅडव्हान्स 2025 परीक्षेचा निकाल सोमवारी सकाळी जाहीर झाला. या परीक्षेतील पेपर 1 व 2 साठी देशभरातून 1 लाख 87 हजार 223 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 1 लाख 80 हजार 422 विद्यार्थी परीक्षा दिली. त्यात 1 लाख 39 हजार 85 मुले तर 41 हजार 337 मुलींचा समावेश होता. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 54 हजार 378 विद्यार्थी पात्र ठरले असून, यामध्ये 9 हजार 404 मुली आहेत. परीक्षेत सर्वोच्च यश आयआयटी दिल्ली झोनमधील रजित गुप्ता याने मिळवले. त्याने 360 पैकी 332 गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला आहे. मुलींमधून आयआयटी खरगपूर झोनमधील देवदत्ता माझी हिने 312 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिचा सीआरएल रँकिंगमध्ये 16 वा क्रमांक आहे.
मुलांमध्ये आयआयटी दिल्ली झोनमधील सक्षम जिंदाल हा 332 गुण मिळवून सीआरएलमध्ये दुसर्या स्थानावर आहे. आयआयटी मुंबई झोनमधून परीक्षा दिलेला माजिद हुसेनने 330 गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्याचप्रमाणे या परीक्षेमध्ये पहिल्या 10 जणांमध्ये मुंबईतून पार्थ वर्तक व साहिल देव यांनी बाजी मारली आहे. पार्थ वर्तक याने 360 पैकी 327 गुण मिळवून चौथा क्रमांक पटकावला आहे, तर साहिल देव याने 360 पैकी 321 गुण मिळवून सातवा क्रमांक पटकावला आहे. या दोघांनीही आयआयटी मुंबई झोनमधून परीक्षा दिली.
पहिल्या 10 मध्ये आयआयटी दिल्ली झोनची बाजी : या निकालामध्ये आयआयटी दिल्ली झोनने बाजी मारली आहे. या झोनमधील चार विद्यार्थ्यांनी पहिल्या 10 जणांच्या यादीत स्थान मिळवले. त्याखालोखाल आयआयटी मुंबईतील तीन विद्यार्थ्यांनी, आयआयटी हैदराबादचे दोन, तर आयआयटी कानपूर झोनमधील एका विद्यार्थ्याने पहिल्या 10 जणांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
नोंदणीकृत विद्यार्थी : 1,87,223
परीक्षेला बसलेले : 1,80,422
मुले : 1,39,085 मुली : 41,337
पात्र ठरलेले : मुले 54,378, मुली 9,404