

नाशिक: फेसबुकवर झालेल्या मैत्रीच्या जाळ्यात अडकून तब्बल ५५ लाख रुपये गमावल्याने एका कृषी अधिकाऱ्याने आपले जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना नाशिकमध्ये घडली आहे. प्रशांत पाटील असे या अधिकाऱ्याचे नाव असून, ते पालघर जिल्ह्यातील जव्हार पंचायत समितीमध्ये कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते. याप्रकरणी त्यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून सायबर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत पाटील यांची काही काळापूर्वी फेसबुकवर एका महिलेशी ओळख झाली होती. या महिलेने त्यांना 'हापको ऑईल' नावाचे तेल स्वस्तात खरेदी करून ते चढ्या दराने विकण्याच्या योजनेचे आमिष दाखवले. यातून मोठा नफा मिळेल, असे आश्वासन तिने दिले होते.
या योजनेवर विश्वास ठेवून प्रशांत पाटील यांनी पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. या फसव्या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी केवळ आपली बचतच नव्हे, तर तब्बल ३० तोळे सोन्याचे दागिने विकले आणि कर्जही काढले होते. टप्प्याटप्प्याने त्यांनी या महिलेला एकूण ५५ लाख रुपये दिले. मात्र, पैसे दिल्यानंतर ना त्यांना कोणताही नफा मिळाला, ना गुंतवलेली रक्कम परत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रशांत पाटील प्रचंड मानसिक तणावाखाली आले.
अखेरीस, या फसवणुकीच्या धक्क्यातून सावरू न शकल्याने त्यांनी नाशिक येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे प्रशांत पाटील यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरोधात फसवणुकीचा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलीस आता या फेसबुक फ्रेंड महिलेचा शोध घेत असून, या ऑनलाइन फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.